ऍडलेडमध्ये आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने जाताना विराटने प्रेक्षकांकडे पाहून अभिवादन केलं, तेव्हापासून विराटच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. टेस्टनंतर आता वनडेमध्येही विराट सिडनीमध्येच शेवटचा सामना खेळेल, अशी शंका चाहत्यांकडून उपस्थित केली जात आहे. त्यातच विराटचा आरसीबीमधला माजी सहकारी पार्थिव पटेल याची एक सोशल मीडिया पोस्ट समोर आली आहे, ज्यामुळे चाहत्यांच्या मनातला संशय आणखी वाढला आहे. हे सिडनी आहे, अशी पोस्ट पार्थिव पटेलने केली आहे.
advertisement
पार्थिव पटेलच्या या पोस्टवरून चाहत्यांनी विराट सिडनीमध्येच निवृत्त होणार, अशा प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. चाहत्यांच्या या रिएक्शन पाहून अखेर पार्थिव पटेलला स्वतःला पुढे यावं लागलं. विराट निवृत्ती घेणार नाही, असं उत्तर पार्थिव पटेलने एका चाहत्याच्या प्रश्नाला दिलं.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भविष्याबद्दल सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेबाबत, प्रसिद्ध क्रिकेट कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी संयमाचे आवाहन केले. 'मला वाटते की आपण मालिका संपेपर्यंत थांबलं पाहिजे आणि त्यानंतरच रोहित आणि विराटबद्दल आपले मत व्यक्त केले पाहिजे', असं हर्षा भोगले म्हणाले.
भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनीही विराट निवृत्ती घेणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे. 'विराटचे अॅडलेडमधल्या चाहत्यांनी स्वागत केले आणि विराटने त्या स्वागतावर प्रतिसाद दिला, यापेक्षा जास्त याकडे पाहू नका. विराट 2027 चा वर्ल्ड कप विराट खेळेल आणि सर्वोच्च कामगिरी करून रिटायर होईल', असं गावसकर म्हणाले.
मागच्या 10 डावात विराटने 0, 0, 1, 84, 11, 100, 22, 52, 5 आणि 20 रन केल्या आहेत. या 10 इनिंगमध्ये त्याने 31.5 च्या सरासरीने 284 रन केल्या आहेत. ज्या विराटच्या वनडे क्रिकेटमधल्या 57.41 च्या सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. विराटने याआधीच 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण जर तो असाच खेळत राहिला, तर त्याला टीम इंडियातलं स्थान टिकवणंही कठीण होईल. कोहलीच्या तुलनेत रोहितने दुसऱ्या सामन्यात 73 रनची खेळी करून टीकाकारांना शांत केले आहे.
ऑस्ट्रेलियानंतर टीम इंडिया त्यांची पुढची वनडे सीरिज घरच्या मैदानात खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 30 नोव्हेंबरपासून 3 वनडे मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे, ज्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसतील.
