फूटवर्कमध्ये विराटचा निष्काळजीपणा
'विराटला लवकर फॉर्ममध्ये परतण्याची गरज आहे. टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा इतकी तीव्र आहे की कुणीही आराम करू शकत नाही, मग तो विराट असो, रोहित असो किंवा टीममधील इतर कुणीही असो. हे सोपं असणार नाही, प्रतिस्पर्धी तर आहेतच. विराट आज पुन्हा एकदा चुकला. त्याच्या फूटवर्कमध्ये निष्काळजीपणा होता. हे सहसा घडत नाही. वनडे क्रिकेटमधील त्याचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे, त्यामुळे सलग दोनवेळा शून्यवर आऊट होणं, त्याच्यासाठी निराशाजनक असेल', असं रवी शास्त्री फॉक्स स्पोर्ट्सवर म्हणाले आहेत.
advertisement
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराटचा धमाका
विराट कोहली हा आता फक्त वनडे क्रिकेटमध्येच खेळत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट सात महिन्यांनी टीम इंडियामध्ये परत आला आहे. स्पर्धात्मक क्रिकेट बऱ्याच दिवसांनी खेळत असल्याचं विराटच्या फॉर्मवरून स्पष्टपणे दिसत आहे, असं मत क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराटने धमाकेदार कामगिरी केली होती. स्पर्धेत सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट टॉप-5 मध्ये होता. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून फक्त श्रेयस अय्यरने विराटपेक्षा जास्त रन केल्या होत्या, त्यामुळे विराट अजूनही चांगली कामगिरी करून त्याच्या टीकाकारांना प्रत्युत्तर देऊ शकतो.
गंभीर-आगरकरने वाढवला सस्पेन्स
विराट कोहलीने 2027 चा वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वर्ल्ड कपआधी भारतीय टीम 20 वनडे मॅच खेळणार आहे, त्यासाठी कोच गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर टीम तयार करत आहेत. विराटची बॅट जर अशीच शांत राहिली, तर एखाद्या तरुण खेळाडूला संधी द्यायलाही गंभीर आणि आगरकर मागे पुढे पाहणार नाहीत. तसंच आगरकर आणि गंभीर यांनी विराट 2027 चा वर्ल्ड कप खेळेल, असं स्पष्टपणे सांगितलेलं नाही, त्यामुळे विराटला स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी जास्त वेळ मिळणं कठीण झालं आहे.
