इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचं आमंत्रण दिल्यानंतर टीम इंडियाची सुरूवात उत्कृष्ट झाली. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या ओपनरनी टीम इंडियाला 91 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. परदेशामधल्या पहिल्या टेस्टमधली टीम इंडियाची चौथी सर्वोत्कृष्ट ओपनिंग पार्टनरशीप होती. इंग्लंडमधल्या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच सत्रात टीम इंडियाचे ओपनर 100 रनची सुरूवात करून देणार, असं वाटत असतानाच केएल राहुल 42 रनची खेळी करून आऊट झाला.
advertisement
राहुलने केली विराटचीच चूक
विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर केएल राहुल हा भारतीय टीमचा सगळ्यात अनुभवी बॅटर आहे, त्यामुळे विराटच्या गैरहजेरीमध्ये राहुलकडून टीम इंडियाला अपेक्षा होत्या, पण राहुलने विराट जी चूक करायचा तीच चूक केली. ब्रायडन कार्सने ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेल्या बॉलवर राहुलने कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल राहुलच्या बॅटच्या एजला लागला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या जो रूटने कॅच पकडला. विराट कोहलीदेखील ऑफ स्टम्पबाहेरचा बॉल मारताना अनेक वेळा असाच आऊट झाला. तेव्हाही विराट कोहलीवर अनेक वेळा टीका करण्यात आली होती.
साई सुदर्शन पहिल्याच इनिंगमध्ये फेल
आयपीएल 2025 मध्ये धमाका करणाऱ्या साई सुदर्शनला पहिल्या टेस्टमधूनच पदार्पणाची संधी मिळाली, पण या संधीचं त्याला सोनं करता आलं नाही. 4 बॉलमध्ये शून्य रनवर साई सुदर्शन आऊट झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने साई सुदर्शनची विकेट घेतली. सुरूवातीपासूनच इंग्लडने साई सुदर्शनसाठी सापळा रचला होता, ज्यामध्ये तो अडकला. इंग्लंडने पहिल्या बॉलपासूनच साई सुदर्शनसाठी लेग स्लिप लावली होती, यानंतर इंग्लंडच्या बॉलर्सनी साई सुदर्शनच्या पॅडवर बॉल टाकले. पॅडवर आलेला एक बॉल मारत असतानाच विकेट कीपर जेमी स्मिथने साई सुदर्शनचा कॅच पकडला. पहिल्या दिवसाचा लंच झाला तेव्हा भारताचा स्कोअर 98-2 एवढा झाला.