महिन्याभरापूर्वी सुरू असलेल्या आयपीएलमध्ये ऋषभ पंत एक-एक रनसाठी संघर्ष करत होता. लखनऊ सुपरजाएंट्सचा कर्णधार असलेल्या ऋषभ पंतने आयपीएल 2025 च्या 14 सामन्यांमध्ये ऋषभ पंतने 32.90 च्या सरासरीने आणि 133.16 च्या स्ट्राईक रेटने 269 रन केले, यातल्या 118 रन तर पंतने शेवटच्या सामन्यात केल्या होत्या.
आता ऋषभ पंतने इंग्लंडमध्ये एका सामन्यात दोन शतकं केल्यानंतर लखनऊ सुपरजाएंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर संजीव गोयंका यांनी एक पोस्ट केली आहे. 'एका पाठोपाठ दोन शतकं, ऋषभ पंत आक्रमक, धाडसी, हुशार. टेस्ट क्रिकेटच्या दोन्ही इनिंगमध्ये शतक करणारा इतिहासातला फक्त दुसरा विकेट कीपर,' अशी पोस्ट संजीव गोयंका यांनी केली आहे.
ऋषभ पंतविषयी एवढं भरभरून लिहिणाऱ्या संजीव गोयंका यांनी केएल राहुल याच्या शतकाबद्दल मात्र फक्त एका ओळीमध्येच लिहिलं आहे. 'शतक केल्याबद्दल केएल राहुलचंही अभिनंदन', असं संजीव गोयंका त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. आयपीएल 2024 मध्ये केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यात मैदानामध्ये वाद झाला होता. लखनऊच्या पराभवानंतर गोयंका केएल राहुल याच्यावर भर मैदानात संतापले होते, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर केएल राहुलने लखनऊची साथ सोडली आणि त्यानंतर दिल्लीने त्याला लिलावात विकत घेतलं.