हार्दिक पांड्याने इंग्लंडमधले त्याचे फोटो शेअर केले आहेत. याआधी हार्दिक पांड्या आयपीएल 2025 मध्ये दिसला होता. त्यानंतर हार्दिक विश्रांती घेत आहे. सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी हार्दिक इंग्लंडला गेला आहे. सोशल मीडियावर हार्दिकने त्याचे फोटो शेअर केले आहेत.
हार्दिकच्या या फोटोंमध्ये त्याच्यासोबत त्याचा भाऊ कृणाल पांड्याही आणि इशान किशनही दिसत आहे. हार्दिक, कृणाल आणि इशान स्टायलिश कपडे घालून आणि पोज देऊन फोटो काढत आहेत. इशान किशन हा सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी चॅम्पियनशीप खेळत आहेत, तर हार्दिक आणि कृणाल सुट्टीवर आहेत. हार्दिकने तो नेमका कुठे आहे? हे फोटोंमध्ये सांगितलं नसलं तरी इशान किशन इंग्लंडमध्ये असल्यामुळे पांड्या बंधूही इंग्लंडमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे.
advertisement
हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या आयपीएल 2025 मध्ये खेळले होते. कृणाल पांड्याने आरसीबीला त्यांची पहिली ट्रॉफी जिंकवण्यात मोलाची भूमिका बजावली. तर हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सना प्ले-ऑफमध्ये पोहोचवलं. दुसरीकडे इशान किशनचं काऊंटी चॅम्पियनशीपचं पदार्पण धमाकेदार झालं. नॉटिंघमशरकडून 2 मॅच खेळण्यासाठी इशान किशनने करार केला आहे. यॉर्कशरविरुद्ध ट्रेन्ट ब्रीजमध्ये झालेल्या पहिल्याच सामन्यात इशान किशनने 87 रनची खेळी केली, ज्यात 12 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता.
हार्दिक टेस्टपासून दूर
हार्दिक पांड्या हा त्याच्या फिटनेसमुळे टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेट खेळत नाही. हार्दिकने त्याच्या करिअरमध्ये 11 टेस्ट खेळल्या, यात त्याने 31.29 च्या सरासरीने 532 रन केले, ज्यामध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने बॉलिंगमध्ये 17 विकेट घेतल्या. 50 रनवर 6 विकेट ही त्याची टेस्ट क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी आहे. 2017 साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून हार्दिकने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तर एक वर्षानंतर 2018 साली हार्दिक इंग्लंडविरुद्ध त्याची शेवटची टेस्ट खेळला.