कोणत्याही फास्ट बॉलरकडून तो विरोधी टीमच्या बॅटरना नव्या बॉलने त्रास देईल, अशी अपेक्षा असते, पण बुमराहला या सीरिजमध्ये नव्या बॉलने भेदक बॉलिंग करता आलेली नाही. आतापर्यंतच्या टेस्ट सीरिजमध्ये बुमराहने 7 वेळा नव्या बॉलने बॉलिंग केली, यातल्या 5 वेळा त्याला एकही विकेट घेता आलेली नाही.
नव्या बॉलने बुमराह फ्लॉप
जसप्रीत बुमराहने या सीरिजमध्ये नव्या बॉलने 39 ओव्हर बॉलिंग केली आहे, यात त्याने 130 रन दिल्या असून फक्त 4 विकेट घेतल्या आहेत, म्हणजेच बुमराहला मिळालेल्या 12 विकेटपैकी नव्या बॉलने त्याला फक्त 4 विकेट मिळाल्या आहेत. लीड्समध्ये झालेल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये बुमराहने 5 विकेट घेतल्या, तर दुसऱ्या इनिंगमध्ये बुमराहला एकही विकेट मिळाली नाही, त्यामुळे इंग्लंडने 370 पेक्षा जास्त रनचं आव्हान शेवटच्या दिवशी अगदी सहज पार केलं. दुसऱ्या टेस्टमध्ये त्याला आराम देण्यात आला, पण या सामन्यात भारताचा विजय झाला.
advertisement
लॉर्ड्स टेस्टमध्ये बुमराहने पुनरागमन केलं आणि पुन्हा पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या. या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला 2 विकेट मिळाल्या, पण खराब बॉलिंगमुळे इंग्लंडच्या बॅटरनी महत्त्वाच्या पार्टनरशीप केल्या.
इंग्लंडमधील बुमराहची कामगिरी
बुमराहने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत 12 टेस्ट मॅच खेळल्या आहेत, ज्यात त्याने 25.73 च्या सरासरीने 49 विकेट घेतल्या आहेत. मॅनचेस्टर टेस्टच्या तिसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत बुमराहला एकही विकेट घेता आलेली नाही. 18 ओव्हरमध्ये बुमराहने 54 रन दिल्या आहेत. मॅनचेस्टर टेस्टमध्ये बुमराहला एक विकेट मिळाली तर तो इंग्लंडमध्ये त्याच्या 50 विकेट पूर्ण करेल. हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरेल.
बुमराह नसताना जास्त विजय
बुमराह खेळत असताना टीम इंडियाच्या विजयाचे आकडेही धक्कादायक आहेत. जसप्रीत बुमराह ज्या 47 टेस्ट मॅच खेळला आहे, त्यातला 20 सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला, तर 23 मॅच टीमने गमावल्या आणि 5 मॅच ड्रॉ झाल्या. बुमराह खेळल्यानंतर भारताच्या विजयाची टक्केवारी 43% आहे.
दुसरीकडे बुमराहच्या पदार्पणानंतर टीम इंडियाने त्याच्याशिवाय 27 मॅच खेळल्या आहेत, यातल्या 19 सामन्यांमध्ये भारताचा विजय आणि 5 सामन्यांमध्ये पराभव झाला, तर 3 मॅच ड्रॉ झाल्या. बुमराहच्या गैरहजेरीमध्ये टीम इंडियाची विजयी टक्केवारी 70% आहे.