क्रीस वोक्सच्या बॉलिंगवर ऋषभ पंतने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा अंदाज चुकला आणि बॉल थेट त्याच्या पायावर जाऊन लागला. यानंतर लगेचच ऋषभ पंतने बूट काढले, तेव्हा त्याच्या पायाला सूज आली होती आणि पायातून रक्तही येत होतं.
ऋषभ पंतला झालेली दुखापत किती गंभीर आहे, हे अजून समजू शकलेलं नाही. पण तो मैदान सोडून गेल्यानंतर रवींद्र जडेजा बॅटिंगला आला. ऋषभ पंत मैदानाबाहेर गेला तेव्हा भारताचा स्कोअर 212/3 एवढा झाला होता. 48 बॉलमध्ये 37 रन करून पंत रिटार्यड हर्ट झाला. याआधी मागच्या सामन्यातही विकेट कीपिंग करताना पंतला दुखापत झाली होती, त्यामुळे तो विकेट कीपिंग करू शकला नव्हता, त्याच्याऐवजी ध्रुव जुरेलने विकेट कीपिंग केली होती.
या सामन्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी भारताला 94 रनची पार्टनरशीप करून दिली. केएल राहुल 46 रनवर आणि यशस्वी जयस्वाल 58 रनवर आऊट झाला. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या साई सुदर्शननेही अर्धशतक केलं. या सामन्यामध्ये टीम इंडियाने 3 बदल केले. करुण नायरला डच्चू देऊन साई सुदर्शनला संधी देण्यात आली आहे. तर आकाश दीप आणि नितीश रेड्डी दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत, त्यांच्याऐवजी शार्दुल ठाकूर आणि अंशुल कंबोज टीममध्ये आले आहेत. अंशुल कंबोज याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.