जसप्रीत बुमराह चौथ्या टेस्टमध्ये खेळणार असल्याचं मोहम्मद सिराजने सांगितलं आहे. वर्कलोडमुळे बुमराह 5 मॅचच्या सीरिजमध्ये 3 मॅच खेळेल हे टीम इंडियाने आधीच स्पष्ट केलं होतं. आता मॅनचेस्टरमध्ये बुधवारपासून सुरू होणारी मॅच बुमराहची सीरिजमधील तिसरी टेस्ट असेल. दुसऱ्या टेस्टमध्ये बुमराह खेळला नव्हता, त्या सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवला होता. यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये बुमराहचं टीममध्ये पुनरागमन झालं. हा सामना भारताने 22 रननी गमावला.
advertisement
टीम इंडिया सीरिजमध्ये पिछाडीवर असल्यामुळे बुमराहने दोन्ही टेस्ट खेळाव्यात, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने दिली होती. मॅनचेस्टरमध्ये टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशननंतर सिराजने बुमराह चौथ्या टेस्टमध्ये खेळेल, हे स्पष्ट केलं आहे. 'माझ्या माहितीनुसार बुमराह खेळेल. दुखापतींमुळे टीममध्ये बदल होत आहेत', असं सिराजने पत्रकारांना सांगितलं.
अंशुल कंबोज टीममध्ये
पुढील सामन्याच्या योजनांबद्दल विचारले असता सिराज म्हणाला, 'इंग्लंड ज्या पद्धतीने खेळतो ते पाहता, आमची योजना चांगल्या लाईन आणि लेंथने बॉलिंग सुरू ठेवण्याची आहे. त्यांनी मागच्या सामन्याप्रमाणे संयमाने खेळावे अशी आमची इच्छा आहे. आम्हाला टेस्ट क्रिकेट खेळण्याचा आनंद झाला.' अर्शदीप सिंग हाताच्या दुखापतीमुळे मँचेस्टर कसोटीतून बाहेर झाला आहे, त्यामुळे भारताने फास्ट बॉलर अंशुल कंबोजचा टीममध्ये समावेश केला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे नितीश रेड्डीलाही उर्वरित मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे, ज्यामुळे भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल होणार आहे.
आकाश दीपला मांडीची दुखापत
मांडीच्या दुखापतीने ग्रस्त असलेल्या आकाश दीपने सोमवारी मुख्य नेटमध्ये बॉलिंग केली नाही. 'आकाशदीपला मांडीचा त्रास आहे, फिजिओ त्याची तपासणी करत आहेत. त्याने सकाळीही बॉलिंग केली होती. फिजिओकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. अर्शदीपला दुखापत झाल्यानंतर अंशुलला टीममध्ये घेण्यात आले आहे. त्याला शुभेच्छा', असं मोहम्मद सिराज म्हणाला आहे.