टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार बीसीसीआय जसप्रीत बुमराहबाबतच्या त्यांच्या सध्याच्या धोरणाचा आढावा घेणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर बुमराहच्या फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंटवरून झालेल्या गोंधळामुळे हा आढावा घेतला जात आहे. खरं तर, या मालिकेपूर्वी, बुमराह 5 पैकी फक्त 3 टेस्ट खेळेल अशी घोषणा करण्यात आली होती. पण त्या 3 टेस्ट कोणत्या असतील हे स्पष्ट नव्हते.
advertisement
याचा परिणाम मागच्या 2 टेस्ट सामन्यांमध्ये दिसून आला, जिथे बुमराह मँचेस्टरमध्ये खेळला होता पण त्याला ओव्हलमध्ये विश्रांती घ्यावी लागली. ओव्हलची खेळपट्टी फास्ट बॉलिंगसाठी अनुकूल असूनही बुमराह या सामन्यात खेळू शकला नाही. बुमराहबद्दलची ही परिस्थिती आता बीसीसीआयलाही त्रासदायक ठरत आहे. या परिस्थितीमध्ये कोणत्याही टेस्ट सीरिजसाठी टीम निवडीसंबंधी योजना आखणं कठीण होत आहे, कारण बुमराह कोणत्या मॅच खेळेल आणि कोणत्या नाही, याबद्दल स्पष्टता नाही, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
बीसीसीआय आता बुमराहला त्याच सीरिजमध्ये निवडण्याचा विचार करेल, ज्यात तो सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असेल. यासाठी मेडिकल टीम आणि स्ट्रेन्थ-कंडिशनिंग कोचिंग टीमवर सगळी जबाबदारी असेल. प्रत्येक सीरिजसाठी टीमची निवड करण्याआधी मेडिकल टीमला बुमराहच्या फिटनेसबाबत खुलासा करावा लागेल. तसंच स्ट्रेन्थ-कंडिशनिंग टीम फिटनेसच्या आधारावर त्याच्या वर्कलोडच्या मर्यादा ठरवेल.
पुढच्या सीरिजसाठी बुमराहला विश्रांती?
बीसीसीआयचे बुमराहबद्दलचे हे धोरण कधी अंमलात आणलं जाणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल. टीम इंडिया आता ऑक्टोबर-नोव्हेंबरपूर्वी कोणतीही टेस्ट सीरिज खेळणार नाही. भारताची पुढची टेस्ट वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानात होणार आहे, ज्यात 2 टेस्ट मॅच खेळवल्या जाणार आहेत. या सीरिजमध्ये बुमराहला पूर्ण विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.