गुवहाटी: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा 201 धावांवर ऑलआउट झाला. आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा केल्या होत्या. आता पहिल्या डावात आफ्रिकेकडे 288 धावांची आघाडी झाली आहे.
दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने कालच्या 9 धावसंख्येवरून खेळ्यास सुरूवात केली. टीम इंडियाचे फलंदाज आफ्रिकेला सडेतोड उत्तर देतील असे वाटले होते. मात्र आघाडीच्या आणि मधळ्या फळीतील सर्वांनी निराशा केली. सलामीवीर केएल राहुल फक्त 22 धावांवर बाद झाला. त्यानंतर साई सुंदर्शन 15, ध्रुव झुरेल शून्यावर, कर्णधार ऋषभ पंत 7, रविंद्र जडेजा 6, नितीश कुमार रेड्डी 10, कुलदीप यादव 19, जसप्रीत बुमराह 5 आणि मोहम्मद सिराज 2 धावांवर बाद झाले.
advertisement
भारताकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 58 तर वॉशिंग्टन सुंदरने 48 धावांची खेळी केली. तळातील फलंदाजांमध्ये सुंदरने केलेल्या धावांमुळे भारताला 200 धावांचा टप्पा गाठता आला. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या निम्म्या धावा देखील केल्या नाही. आफ्रिकेने भारताला फॉलोऑन देण्या ऐवजी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेकडून मार्को जॅन्सेनने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या.
दोन्ही संघातील कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना आफ्रिकेने जिंकला होता. त्यामुळे मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी टीम इंडियाला या कसोटीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागले. जर भारताने ही कसोटी गमावली किंवा ड्रॉ जरी केली तरी भारताचा मालिकेत 1-0 असा पराभव होऊ शकतो. न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी पराभवानंतर भारतासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.
आता दुसऱ्या डावात टीम इंडियाचे गोलंदाज आफ्रिकेला किती धावात रोखतात आणि चौथ्या डावात फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
