आयपीएल 2024 मध्ये चॅम्पियन झालेली केकेआरची एका वर्षाच्या आत अशी अवस्था व्हायला अनेक कारणं जबाबदार आहेत. यावर्षीच्या खराब कामगिरीला केकेआरला पाच चुका महागात पडल्या आहेत.
श्रेयस अय्यरला सोडलं
केकेआरला मागच्या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकवण्यात श्रेयस अय्यरने मोलाची भूमिका बजावली, पण या मोसमात केकेआरने श्रेयस अय्यरला रिटेन केलं नाही. मागच्या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकवूनही त्याचं श्रेय आपल्याला दिलं गेलं नसल्याची खंत श्रेयस अय्यरने व्यक्त केली होती.
advertisement
गंभीरला पर्याय सापडला नाही
श्रेयस अय्यरसोबतच गौतम गंभीरनेही मागच्या मोसमात केकेआरला ट्रॉफी जिंकवून देण्यात योगदान दिलं होतं, पण गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच झाल्यामुळे त्याला केकेआरची साथ सोडावी लागली. गंभीरने साथ सोडल्यानंतर केकेआरला प्रशिक्षक म्हणून त्याच्यासारखा पर्याय सापडला नाही.
अजिंक्यवर विश्वास नाही
आयपीएल 2025 मध्ये सुरूवातीला अजिंक्य रहाणेला कोणत्याच टीमने विकत घेतलं नाही. यानंतर शेवटच्या क्षणी केकेआरने रहाणेला त्याच्या बेस प्राईजवर टीममध्ये घेतलं. तसंच त्याला कर्णधारही केलं, पण लिलावात सुरूवातीलाच विकत न घेतलेल्या खेळाडूला केकेआरने टीमचं नेतृत्व दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं.
चुकीच्या खेळाडूंची निवड
आयपीएल लिलावाआधी केकेआरने रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, सुनिल नरेन, हर्षीत राणा आणि रमणदीप सिंग यांना रिटेन केलं, तर लिलावामध्ये व्यंकटेश अय्यरवर तब्बल 23.75 कोटी रुपये खर्च केले, पण यातल्या कोणत्याच खेळाडूला या मोसमात त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
पिचचीही साथ नाही
आयपीएलच्या या मोसमात केकेआरला त्यांच्या घरच्या मैदानातल्या खेळपट्टीची साथ मिळाली नाही. सुरूवातीच्याच सामन्यांनंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने ईडन गार्डनची खेळपट्टी केकेआरच्या टीमला मदत करणारी असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण ईडन गार्डनच्या क्युरेटरने मात्र याला मीडियासमोर येऊन नकार दिला, त्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता.