पंजाब किंग्जविरुद्ध पराभवामुळे आता मुंबईला प्लेऑफमध्ये एलिमिनेटर सामना खेळावा लागेल हे स्पष्ट झाले आहे.पण मुंबई इंडियन्सने यापूर्वी चार वेळा एलिमिनेटर सामने खेळली आहे,परंतु प्रत्येक वेळी अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकली नाही.त्यामुळे यंदाच्या हंगामातही हार्दिकच्या नेतृत्वाखाली हा संघ यावेळी इतिहास बदलू शकेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. यापूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, संघाने पाच वेळा (2013, 2015,2017,2019 आणि 2020) आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. मुंबईने एकूण 10 वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे, त्यापैकी पाच वेळा टॉप-2 मध्ये राहून विजेतेपद जिंकले आहे.
advertisement
मुंबई पहिल्यांदा 2010 मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहोचली होती, परंतु चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून त्यांचा पराभव झाला होता. याशिवाय, मुंबई 2011, 2012, 2014 आणि 2023 मध्ये देखील प्लेऑफमध्ये पोहोचली होती, परंतु या हंगामात तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर राहिल्यामुळे त्यांना एलिमिनेटर खेळावे लागले होते. या चारही वेळा, मुंबई कधीही अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही. त्यामुळे आता हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईला हा इतिहास बदलता येणार आहे का? किंवा हाच इतिहास कायम राहणार? हे पाहणे महत्वाचे असेल.
एलिमिनेटरमध्ये मुंबईची कामगिरी
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत चार वेळा एलिमिनेटर सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत.
2011: मुंबईने एलिमिनेटर जिंकला पण क्वालिफायर २ मध्ये पराभव पत्करला.
2012: मुंबई एलिमिनेटरमध्ये पराभूत झाली.
2014: मुंबई पुन्हा एलिमिनेटरमध्ये पराभूत झाली.
2023: मुंबईने एलिमिनेटर जिंकला पण क्वालिफायर २ मध्ये पराभव पत्करावा लागला.
या सर्व हंगामात तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर राहूनही, मुंबई अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही, जेतेपद तर दूरच राहिलं
एलिमिनेटर सामना कुठे रंगणार?
या हंगामातील एलिमिनेटर सामना 30 मे 2025 रोजी मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. मुंबई इंडियन्सचा प्रतिस्पर्धी कोण असेल हे लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून आहे.जर बंगळुरू जिंकली तर गुजरात टायटन्स एलिमिनेटरमध्ये खेळेल; अन्यथा,बंगळुरूला मुंबईशी सामना करावा लागेल.