204 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाबची अवस्था मुंबईने बिकट करून ठेवली होती, पण श्रेयस अय्यर आणि नेहल वढेराने मुंबईच्या तोंडातला विजयाचा घास हिरावून आणला. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने फक्त 5 मिनिटांमध्येच मॅचचं चित्र बदलून टाकलं आणि पंजाबला फायनलचं तिकीट मिळालं.
आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई मजबूत स्थितीमध्ये होती, पण 13 व्या ओव्हरमध्ये मॅचचा निकाल बदलला. 12 ओव्हरनंतर पंजाबचा स्कोअर 3 विकेट गमावून 109 रन होता, त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने टीमचा अनुभवी फास्ट बॉलर रीस टॉपलीला 13वी ओव्हर टाकायला दिली आणि यानंतर संपूर्ण मॅचचं समीकरणच बदलून गेलं.
advertisement
इनिंगची 13 वी ओव्हर टाकायला आलेल्या रीस टॉपलीच्या पहिल्या बॉलवर नेहल वढेराने एक रन काढून पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरला स्ट्राईक दिला. यानंतर अय्यरने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर तीन सिक्स ठोकले आणि एका झटक्यात मॅच मुंबईच्या हातातून गेली.
मजबुरीमुळे मिळाली संधी
रीस टॉपली मुंबई इंडियन्सची पहिली पसंत नव्हता. मुंबईचा फास्ट बॉलर दीपक चहर याला दुखापत झाली, त्यानंतर गुजरातविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये रिचर्ड ग्लीसनला संधी मिळाली, पण त्या सामन्यात ग्लीसनलाही दुखापत झाली, त्यामुळे मजबुरी म्हणून रीस टॉपलीची टीममध्ये निवड करण्यात आली होती.
बॉलिंगमध्ये दिसली नाही धार
रीस टॉपलीचा यंदाच्या मोसमातला हा पहिलाच सामना होता, पण तरीही मुंबईची टीम आणि चाहत्यांना तो चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती, पण यात तो अपयशी ठरला. टॉपलीने 3 ओव्हरमध्ये 13.33 च्या इकोनॉमी रेटने 40 रन दिले, पण यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. मुंबईकडे अर्जुन तेंडुलकरच्या रुपात डावखुरा फास्ट बॉलर आणि भारतीय खेळाडू उपलब्ध होता, पण त्यालाही यंदाच्या मोसमात एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही.