बीसीसीआयने करार केलेले खेळाडू जे सर्व फॉरमॅटमध्ये नियमित खेळत आहेत, त्यांना वर्कलोडच्या नावाखाली 'पिक ऍण्ड चूस' करता येणार नाही, याबद्दलचा संदेश खेळाडूंना दिला जाईल, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितलं आहे.
'याचा अर्थ वर्कलोड मॅनेजमेंट कचऱ्याच्या टोपलीत टाकलं जाईल, असा नाही, पण नजीकच्या भविष्यात अधिक वस्तूनिष्ठ दृष्टिकोन ठेवला जाईल. फास्ट बॉलर्ससाठी वर्कलोडचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, पण वर्कलोडच्या नावाखाली खेळाडू महत्त्वाच्या सामन्यासाठी उपलब्ध नसतील, तर हे मान्य करता येणार नाही', असा थेट संदेश बीसीसीआयकडून देण्यात आला आहे.
advertisement
बुमराहचं भविष्य काय?
वर्कलोडबद्दल बीसीसीआय आणि कोच गौतम गंभीर कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्यामुळे आता जसप्रीत बुमराहच्या टेस्ट करिअरबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. इंग्लंडमधल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये बुमराह फक्त 3 मॅच खेळला, यानंतर आता महिनाभराच्या विश्रांतीनंतर तो 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान युएईमध्ये होणाऱ्या आशिया कप टी-20 खेळेल, अशी अपेक्षा आहे. आशिया कपनंतर बुमराह वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये खेळणार नाही, पण तो नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये खेळेल, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज याने 6 आठवड्यांमध्ये इंग्लंड दौऱ्यातल्या सर्व 5 टेस्ट खेळल्या, ज्यात त्याने 185.3 ओव्हर टाकल्या, तरीही तो शेवटच्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी तेवढ्याच उर्जेने बॉलिंग करत होता, त्यामुळे सिराजचं कौतुक केलं जात आहे. तसंच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनेही दुखापतीच्या समस्या असूनही चौथ्या टेस्टमध्ये मॅरेथॉन स्पेल टाकला. सिराज आणि स्टोक्सच्या या कामगिरीनंतर टीमपेक्षा वर्कलोड महत्त्वाचा आहे का? असे प्रश्नही चाहत्यांकडून उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
गावसकरांची वर्कलोडवर टीका
भारताचे महान खेळाडू सुनिल गावसकर यांनीही वर्कलोडच्या अतिरेकी वापरावर टीका केली आहे. 'जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत असता, तेव्हा वेदना विसरून जा. सीमेवरचा जवान कधी थंडीबद्दल तक्रार करतो का? ऋषभ पंत फ्रॅक्चर असूनही मैदानात बॅटिंगला आला. खेळाडूंकडून तुम्हाला हेच अपेक्षित आहे. भारताकडून क्रिकेट खेळणे हा एक सन्मान आहे', असं गावसकर इंडिया टुडेसोबत बोलताना म्हणाले.
'तुम्ही 140 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करता, तेच आम्ही मोहम्मद सिराजमध्ये पाहिले. वर्कलोडचा फुगा सिराजने फोडून टाकला आहे. 5 टेस्टमध्ये सिराजने न थांबता 7-8 ओव्हरचे स्पेल टाकले, कारण कर्णधार आणि देशाकडून त्याला अपेक्षा होत्या. वर्कलोड हा शब्द भारतीय क्रिकेटच्या शब्दकोशातून निघून जाईल, अशी आशा मला आहे. मी बऱ्याच काळापासून हे बोलत आहे. वर्कलोड ही फक्त मानसिक गोष्ट आहे, शारीरिक नाही', असं गावसकर म्हणाले.