विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दुसरी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023-24 आयोजित करण्यात आली होती. मित्र परिवार आणि ब्रह्मपुरी तालुका कुस्तीगीर संघाच्यावतीने चंद्रपूर मधील ब्रह्मपुरी येथे या स्पर्धा पार पडल्या. तर या स्पर्धेत दुसऱ्या महिला महाराष्ट्र केसरीचा किताब कोल्हापूरच्या अमृता पुजारीने पटकावला. 76 किलो वजन गटाच्या अंतिम सामन्यात सांगलीच्या प्रतीक्षा बागडीला चितपट करत अमृताने ही कामगिरी केली आहे.
advertisement
वीरपत्नीच्या कपाळी तब्बल 21 वर्षांनी कुंकू, मुलीच्या लग्नावेळी काय घडलं? Video
कोण आहे अमृता पुजारी?
अमृता शशिकांत पुजारी ही कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात राहणारी एक महिला पैलवान आहे. गेली 3 ते 4 वर्षे अमृता ही मुरगडच्या लोकनेते सदाशिव मंडलिक आंतरराष्ट्रिय कुस्ती संकुल येथे सराव करीत आहे. एन.आय.एस. कुस्ती कोच दादासो लवटे आणि वस्ताद सुखदेव येरुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमृता कुस्तीचे धडे घेत आहे. आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या कुस्तीपटू स्वाती शिंदे, नंदिनी साळोखे यांच्यासह अमृता सराव करते. तसेच महाराष्ट्र आणि इतर राज्यातील एकूण 55 मुली या कुस्ती संकुलात सराव करत आहेत. तिच्या कष्टाच्या जोरावर तिने राज्य आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करून अनेक पदके प्राप्त केली आहेत.
महाराष्ट्र केसरीच्या यशाने खूप आनंदी आहे. पण या यशावर समाधान न मानता राजस्थान येथे होणाऱ्या वरिष्ठ गटातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत देखील सुवर्णपदक मिळवण्यासाठी माझी तयारी सुरू आहे. तसेच पुढील काळात ऑलम्पिक मध्येही सुवर्णपदकाला गवसणी घालणे माझे ध्येय आहे, असेही अमृताने स्पष्ट केले आहे.
कशी केली महाराष्ट्र केसरीची तयारी?
मागच्या वेळी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अमृताला प्रतीक्षा बागडीकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यानंतर जोमाने तयारी करत यंदा अंतिम लढतीमध्ये अमृताने प्रतीक्षा बागडीवर 3-2 गुणाने मात करून महाराष्ट्र केसरी किताब पटकाविला आहे. यासाठी तिने वेगवेगळ्या टेक्निकची प्रॅक्टिस, रनिंग, वजन वाढवणे याकडे जास्त लक्ष दिले. त्याचबरोबर मागच्या वर्षीचे यावेळी असणारे प्रतिस्पर्धी यांचा परिपूर्ण अभ्यास करत सराव सुरू ठेवला. त्यामुळेच अमृता महाराष्ट्र केसरीची गदा उचलू शकली आहे, असे तिचे प्रशिक्षक दादासो लवटे यांनी सांगितले.
दरम्यान, शिरोळच्या इतिहासात प्रथमच पैलवान अमृता पुजारी मुळे महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला आहे. तर मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कठोर परिश्रम घेऊन महाराष्ट्र केसरी किताब मिळवला, याचा परिवारासह गावाला देखील सार्थ अभिमान वाटत असल्याचे मत अमृता पुजरीचे वडील शशिकांत पुजारी यांनी व्यक्त केली आहे.