भारताचा माजी क्रिकेटपटू आर.अश्विन याच्या युट्युब चॅनलवर अश्विनने जडेजाची मुलाखत घेतली, या मुलाखतीमध्ये अश्विनने जडेजाला भारताच्या टेस्ट टीमचा कॅप्टन बनण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न जडेजाला विचारला. त्यावर 'हो निश्चितच, एवढी वर्ष मी वेगवेगळ्या कर्णधारांसोबत खेळलो, मला कर्णधाराच्या शैलीबद्दल माहिती आहे आणि खेळाडू काय विचार करतात, हे मला माहिती आहे', असं उत्तर जडेजाने दिलं.
advertisement
भारताकडून 2012 साली पहिली टेस्ट खेळणाऱ्या जडेजाने एमएस धोनीच्या नेतृत्वात क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं होतं. तसंच आयपीएलमध्येही जडेजा धोनीच्या नेतृत्वात खेळला आहे. 'प्रत्येक कर्णधाराची स्वत:ची शैली असते. मी तीनही फॉरमॅटमध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळलो आहे. धोनीची विचार करण्याची पद्धत एकदम सरळ आहे. एखादा बॅटर एकाच ठिकाणी शॉट मारत असेल तर धोनी तिकडे फिल्डिर निश्चित लावतो', असं जडेजाने सांगितलं.
टेस्ट क्रिकेटमध्ये रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर अश्विनने जडेजाला कर्णधार करण्याचं समर्थन केलं होतं. 'आपण रवींद्र जडेजाला का विसरत आहोत? जर नवा कर्णधार हवा असेल तर दोन वर्ष एखाद्या अनुभवी खेळाडूला जबाबदारी द्या, त्यानंतर नव्या व्यक्तीला कर्णधार बनवा', असं अश्विन त्याच्या युट्युब चॅनलवर म्हणाला होता.
टेस्ट टीमऐवजी टी-20 टीमचं नेतृत्व करणं अधिक कठीण असल्याचंही जडेजाला वाटतं. 'टेस्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला बॉलरच्या गरजेनुसार दोन किंवा तीन फिल्डर बदलावे लागतात, बॅटरच्या हिशोबाने नाही. टेस्ट क्रिकेटमधली कॅप्टन्सी वेगळी आहे, यात फार डोकेदुखी नसते. पण आयपीएल आणि टी-20 मध्ये कॅप्टन्सी करणं आव्हान असतं, कारण तिकडे प्रत्येक बॉल महत्त्वाचा असतो', असं वक्तव्य रवींद्र जडेजाने केलं आहे.