ज्योती कर्नाटकमधल्या बिलगी तालुक्यातील रबकवी गावातील रहिवासी आहे. ज्योतीने तिच्या II PUC बोर्ड परिक्षेमध्ये 83 टक्के मार्क मिळवले होते. यानंतर ज्योतीची उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती, पण घरातल्या आर्थिक परिस्थितीमुळे तिच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. ज्योतीचे वडील तीर्थय्या गावामध्ये एक छोटं चहाचं दुकान चालवतात. मुलीच्या शिक्षणासाठी पैसे जमा करणं तीर्थय्या यांच्यासाठी शक्य होत नव्हतं.
advertisement
गावातला स्थानिक ठेकेदार अनिल हुनाशिकट्टी यांनी ज्योतीसाठी जमखंडीच्या बीएलडीई कॉलेजमध्ये बीसीए मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनिल यांनी बंगळुरूमध्ये आपल्या मित्राला संपर्क केला, जो ऋषभ पंतच्या जवळचा होता. त्यानेही ऋषभ पंतला ज्योतीच्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली.
ऋषभ पंतनेही इंग्लंडमध्ये असतानाच ज्योतीला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं, त्या कॉलेजच्या अकाऊंटवर 40 हजार रुपये ट्रान्सफर केले, यात ज्योतीच्या पहिल्या सेमिस्टरची फी देखील होती. ऋषभ पंतच्या या मदतीमुळे ज्योती भावुक झाली. 'मी II PUC पूर्ण केलं आणि बीसीए कोर्स करण्याचं स्वप्न बघितलं होतं', असं ज्योती म्हणाली आहे.