रोहित शर्माची फिटनेस टेस्ट पास
आयपीएल 2025 नंतर रोहित क्रिकेटमध्ये ॲक्शनमध्ये नव्हता. अशातच आता फिटनेस टेस्टमध्ये रोहित शर्मा पास झाल्याचं पहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फिटनेसवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. मात्र, फिटनेस टेस्ट पास करून रोहितने सर्व टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले असून एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
advertisement
वनडेचं कर्णधारपद कायम
यावर्षी आयपीएलदरम्यान मुंबई इंडियन्सकडून खेळत असताना रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवड बैठकीच्या दोन आठवडे आधी ही घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या माहिती देखील समोर येऊ लागली. बीसीसीआयने रोहितच्या कसोटी निवृत्तीच्या वेळी सोशल मीडिया पोस्टमध्ये पुष्टी केली होती की तो वनडेचा कर्णधार म्हणून कायम राहील.
ऑस्ट्रेलियाचा दौरा शेवटचा?
एका मीडिया रिपोर्टने असेही संकेत दिले होते की, तो ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वनडे दौऱ्यानंतर 50ओव्हर क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. मात्र, त्याने अद्याप या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पीटीआयच्या रिपोर्टनुसार रोहितने फिटनेस टेस्ट पास केली आहे. टेस्ट आणि टी-20 आय मधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहितकडे सध्या कोणतेही असाइनमेंट नाही, पण तो ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करू शकतो. या दौऱ्याच्या तयारीसाठी तो 30 सप्टेंबर, 03 आणि 05 ऑक्टोबर रोजी कानपूरमध्ये ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत ए साठी खेळू शकतो.