सिडनी: रोहित शर्माचे नाबाद क्लासिक शतक आणि विराट कोहलीचे नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर विजय साकारला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात टीम इंडियाने 9 विकेट राखून विजय मिळवला. पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत मालिका जिंकली होती. त्यामुळे भारतासाठी ही लढत प्रतिष्ठेची होती.
advertisement
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 237 धावांचे लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाने हे आव्हान फक्त 38.3 ओव्हर आणि 1 विकेटच्या बदल्यात पार केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जरी भारताने गमावली असली तरी अखेरच्या सामन्यात रोहित आणि विराट यांनी दमदार फॉर्म दाखवत टीकाकारांना उत्तर दिले.
रोहितने 125 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 121धावा केल्या. तर विराटने 81 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 74 धावा केल्या. रोहित आणि विराट जोडीने दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 168 धावांची भागिदारी केली. वनडे क्रिकेटच्या इतिहासात 150 पेक्षा अधिक धावांची भागिदारी करण्याची या दोघांची ही 12वी वेळ आहे. याबाबत त्यांनी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
एकूण सर्वाधिक धावा (ODI + T20I मिळून):
विराट कोहली – 18,437*
सचिन तेंडुलकर – 18,436
कुमार संगकारा – 15,616
रोहित शर्मा – 15,589*
महेला जयवर्धने – 14,143
रिकी पाँटिंग – 14,105
सिडनीतील भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेच्या अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा आपल्या भव्य फलंदाजीने चमकला. सलग काही अपयशांनंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती, पण ‘हिटमॅन’ने आपल्या खास अंदाजात शतक झळकावत सर्व टीकाकारांना दमदार उत्तर दिले.
टीकेनंतर जबरदस्त पुनरागमन
या तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात रोहित फक्त 8 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर आणि क्रिकेट तज्ज्ञांमध्ये ही चर्चा सुरू झाली की आता रोहितला विश्रांती द्यावी आणि त्याच्या जागी तरुण यशस्वीला संधी द्यावी. मात्र सिडनीच्या मैदानावर उतरलेल्या रोहितने सर्वांना उत्तर दिले. त्याच्या बॅटने पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो अजूनही टीम इंडियाचा अविभाज्य भाग आहे आणि मोठ्या मंचावर धडाकेबाज खेळी करण्याची ताकद त्याच्यात कायम आहे.
38 व्या वर्षी 33 वे शतक
या निर्णायक सामन्यात रोहित शर्मा ने 105 चेंडूंत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शानदार शतक ठोकले. ही त्याच्या वनडे कारकिर्दीतील 33 वी शतकी खेळी होती. यासह त्याने एकूण 50 आंतरराष्ट्रीय शतकं पूर्ण केली आणि तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली नंतर हा विक्रम करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला.
ऑस्ट्रेलियात नेहमीच रोहितने मोठ्या डावांची परंपरा राखली आहे. पण पर्थमधील अपयशानंतर त्याच्यावर ‘तो संपला का?’ असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र सिडनीत त्याने एका अशा खेळीने उत्तर दिलं की टीकाकारही त्याच्या समोर नतमस्तक झाले.
सचिन तेंडुलकरचा विक्रम गाठला
रोहितने या सामन्यात आणखी एक ऐतिहासिक पराक्रम केला. सचिन तेंडुलकर हा भारताकडून सर्वाधिक वयात वनडे शतक झळकावणारा खेळाडू आहे. त्याने 38 वर्षे 327 दिवसांच्या वयात शतक झळकावले होते. आता 38 वर्षे 178 दिवसांच्या वयात रोहित शर्माने शतक झळकावून या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
