सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात कॅच घेत असताना श्रेयस अय्यर पडला, यानंतर तो वेदनेमध्ये विव्हळत होता, त्यामुळे त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. श्रेयस अय्यरला आयसीयूमधून बाहेर काढलं असलं, तरी त्याला पूर्णपणे बरं व्हायला निदान एक आठवडा लागणार आहे, त्यामुळे त्याला इतके दिवस सिडनीच्या रुग्णालयात राहावं लागणार आहे. श्रेयस अय्यर भारताच्या टी-20 टीमचा भाग नाही.
advertisement
ड्रेसिंग रूममध्ये परत आल्यानंतर श्रेयस अय्यरच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली, त्यानंतर बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. श्रेयस अय्यरची प्रकृती आता स्थिर असली तरी वेळेत उपचार मिळाले नसते, तर हे धोकादायक ठरू शकलं असतं.
श्रेयस अय्यरला अंतर्गत रक्तस्त्राव
श्रेयस अय्यरच्या दुखापतीचं स्कॅनिंग केल्यानंतर त्याच्या प्लीहा (डाव्या बरगडीच्या खाली) मध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचं स्पष्ट झालं. बीसीसीआयची मेडिकल टीम सिडनी आणि भारतातील तज्ज्ञांसोबत सल्लामसलत करून त्याच्या दुखापतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
पालकांचा व्हिसासाठी अर्ज
भारतीय टीमचे डॉक्टर रिझवान खान श्रेयस अय्यरसोबत आहेत. व्हिसाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर श्रेयस अय्यरच्या कुटुंबातील एक सदस्य मुंबईहून सिडनीला जाण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरचं कुटुंब आठवड्याच्या शेवटी अर्ज करू शकलं नाही, त्यामुळे प्रक्रियेत थोडा विलंब झाला.
