अंडर-19 वर्ल्ड कपच्या या सामन्यात झिम्बाब्वेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर वैभव सूर्यवंशीने सुरूवातीपासूनच आक्रमक बॅटिंग करायला सुरूवात केली. वैभवला टीमच्या इतर खेळाडूंनीही साथ दिली, पण टॉप-ऑर्डरला मोठा स्कोअर करता आला नाही. अखेर पाचव्या क्रमांकावर आलेल्या विहान मल्होत्राने शतक ठोकलं. विहानला अभिज्ञान कुंडूनेही चांगली साथ दिली. विहान आणि अभिज्ञान यांच्यात मोठी पार्टनरशीप झाली नसती, तर या सामन्यात टीम इंडिया अडचणीत सापडली असती.
advertisement
वैभव-आयुषसाठी सोडली बॅटिंग पोजिशन
विहान मल्होत्रा हा वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्यासोबत ज्युनियर-लेव्हल क्रिकेट खेळत आहे. विहान मल्होत्राने वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्यासाठी आपली ओपनिंगची जागा सोडली. इंग्लंड दौऱ्यापूर्वी विहान मल्होत्रा भारतीय अंडर-19 टीममधील स्थान गमावण्याच्या मार्गावर होता, त्याच्या बॅटमधून रनही येत नव्हत्या. इनिंगची सुरूवात करताना विहानला सतत अपयश येत होतं, त्यामुळे त्याला स्वतःची जागा वैभव आणि आयुषसाठी सोडावी लागली.
इंग्लंड दौऱ्याच्या अगदी आधी, पटियाला येथील क्रिकेट हब अकादमीमध्ये सराव करताना मल्होत्राचे प्रशिक्षक कमलप्रीत संधू, ज्यांनी प्रभसिमरन सिंग, अनमोलप्रीत सिंग, नमन धीर आणि कनिका मल्होत्रा सारख्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे, त्यांनी विहान मल्होत्राला सांगितले की त्याने तक्रार करणे थांबवावे आणि त्याच्या नवीन भूमिकेवर काम करायला सुरुवात करावी.
'त्याने आयुष्यभर ओपनिंगला बॅटिंग केली आहे, तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करणे हा त्याच्यासाठी एक बदल होता. मी त्याला हे जाणवून दिले की वैभव आणि आयुषने आता सुरुवातीची जागा स्वतःची बनवली आहे. त्यांनी त्या स्थानावर उत्तम काम केले आहे, आता तुला वेगळा विचार करावा लागेल आणि स्वतःमध्ये बदल करावे लागतील. त्याने तिसऱ्या क्रमांकाचे स्थान स्वतःचे बनवावे', असं विहानचे प्रशिक्षक म्हणाले.
