विराटने केले पुजाराचं अभिनंदन
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने चेतेश्वर पुजाराचं निवृत्ती घेतल्यानंतर अभिनंदन केलं आहे. कोहली टेस्ट टीमचा कर्णधार असताना, पुजाराने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना अनेक वेळा टीमसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. पुजाराने 103 टेस्ट मॅचमध्ये 43.60 च्या सरासरीने 7,195 रन केल्या. पुजारा भारतासाठी टेस्टमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये 8 व्या क्रमांकावर आहे.
advertisement
पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 21,301 रन केल्या. निवृत्तीनंतर दोन दिवसांनी कोहलीने पुजारासाठी एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. कोहलीने पुजाराचे त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल आभार मानले. पुजाराला तिसऱ्या क्रमांकावर असल्याने मला चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करणे सोपे झाले, असं विराट म्हणाला. 'चौथ्या क्रमांकावर माझ्यासाठी गोष्टी सोप्या केल्याबद्दल पुज्जी, धन्यवाद. तुझी कारकीर्द उत्तम होती. भविष्यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा. देव तुला आशीर्वाद देवो', अशी पोस्ट विराटने केली.
विराटच्या नेतृत्वात ऐतिहासिक विजय
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2018-19 मध्ये भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकली, या ऐतिहासिक विजयामध्ये पुजाराने महत्त्वाची भूमिका बजावली. पुजाराने 7 इनिंगमध्ये 521 रन केल्या, याबद्दल त्याला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. यानंतर 2021 मध्येही भारताला ऑस्ट्रेलियामध्ये विजय मिळवून देताना पुजाराने खिंड लढवली. पुजाराने 2010 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरू टेस्टमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पुजारा भारताच्या अनेक संस्मरणीय विजयांचा हिरो राहिला.