रोहित आणि विराट या दोघांनीही भारताला अनेक ट्रॉफी जिंकवून दिल्या. रोहित 2007 टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय टीमचा सदस्य होता, तर विराटने 2011 चा वनडे वर्ल्ड कप जिंकला. यानंतर 2024 सालच्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही भारताचा विजय झाला, त्या टीममध्ये रोहित-विराट होते. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया विजयी झाली, त्याचे शिल्पकारही विराट आणि रोहित होते.
advertisement
टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता विराट आणि रोहित फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळत आहेत. या दोघांनाही भारताकडून 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा आहे, पण बीसीसीआयच्या मनात नेमकं काय चाललं आहे? याबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
आफ्रिकेत होणार वनडे वर्ल्ड कप
वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे. तेव्हा विराट 38 आणि रोहित 40 वर्षांचा असेल. वनडे वर्ल्ड कपआधी दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये 3 वनडे सामन्यांच्या सीरिजमध्ये आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतामध्येही 3 वनडे मॅचची सीरिज खेळतील. यानंतर जानेवारी-जुलै 2026 दरम्यान टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध भारतात आणि इंग्लंडविरुद्ध (परदेशात) 6 वनडे खेळणार आहे.
विराट आणि रोहित यांनी यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं नाही. तसंच आता नोव्हेंबरमधील सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा आणि विजय हजारे ट्रॉफीआधी भारतात कोणतीही देशांतर्गत स्पर्धा नाही, त्यामुळे विराट-रोहितला खेळण्याची संधीही नाही.
तरुणांना संधी
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भवितव्याबाबत बीसीसीआय लवकरच चर्चा करण्याची शक्यता आहे. वनडे वर्ल्ड कपला अजून 2 वर्षांचा कालावधी आहे, या मोठ्या स्पर्धेसाठी टीमची योजना स्पष्ट असली पाहिजे, त्यामुळे बीसीसीआय लवकरच वनडे वर्ल्ड कपसाठी मास्टर प्लान बनवण्याच्या तयारीत आहे. भारताने शेवटचा वनडे वर्ल्ड कप 2011 साली जिंकला होता, त्यामुळे पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यासाठी निवड समिती तरुण खेळाडूंनाही आजमावू शकते.