टीम इंडियाचा लेग-स्पिनर रवी बिष्णोईने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या टेस्टमधून अचानक निवृत्तीच्या मुद्द्यावर मोठे विधान केले आहे. या दोन्ही दिग्गजांनी अचानक निवृत्ती घेणं आपल्यासाठी खूपच धक्कादायक होतं. अशा खेळाडूंनी मैदानातून निरोप घेतला तर बरे वाटते, असं रवी बिष्णोई म्हणाला आहे.
काय म्हणाला रवी बिष्णोई?
रवी बिष्णोईने गेम चेंजर्स पॉडकास्टमध्ये हे वक्तव्य केलं आहे. 'विराट आणि रोहितची निवृत्ती धक्कादायक होती. कारण अनेकांना त्यांना मैदानातून निवृत्त होताना पहायचे होते. हे दोघेही इतके महान खेळाडू आहेत, त्यांनी मैदानतूनच निवृत्ती घेतली असती तर बरं झालं असतं. दोघांनीही भारतासाठी खूप काही केलं आहे. त्यांच्या जवळपासही कोणी नाही', अशी प्रतिक्रिया बिष्णोईने दिली आहे. हे दोन्ही खेळाडू वनडे क्रिकेट खेळत आहेत, त्यामुळे त्यांना वनडे फॉरमॅटमध्ये मैदानातून सन्मानाने जाण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा बिष्णोईने व्यक्त केली आहे.
advertisement
'तुम्हाला त्यांना चांगला निरोप मिळावा, असे वाटते. कदाचित वनडे क्रिकेटमध्ये असं घडेल. त्यांना जेव्हा जायचं असेल तेव्हा त्यांनी जावं, कारण तुम्हाला कधी निवृत्ती घ्यावी लागेल, हे कुणी सांगू शकत नाही. टेस्ट क्रिकेटमधली त्यांची निवृत्ती खरंच माझ्यासाठी धक्कादायक होती. त्यांची जागा कोण घेईल हे मला माहिती नाही', असं रवी बिष्णोई म्हणाला.
बिष्णोई टीम इंडियातून बाहेर
आशिया कपसाठीच्या भारतीय टीममध्ये रवी बिष्णोईची टीम इंडियामध्ये निवड झाली नाही. टी-20 फॉरमॅटमध्ये बिष्णोईने भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. 24 वर्षांच्या या लेग स्पिनरने भारतासाठी 42 सामन्यांमध्ये 61 विकेट घेतल्या आहेत, ज्यात त्याने 7.3 रन प्रती ओव्हरच्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली आहे. 13 रनमध्ये 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये रवी बिष्णोई नंबर 1 बॉलरही बनला होता. इतक्या चांगल्या कामगिरीनंतरही त्याला टीममध्ये स्थान मिळू शकले नाही.