संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सकडून ओपनिंगला खेळायचा, तसंच टीम इंडियाकडूनही संजू ओपनिंगला खेळतो. पण या मोसमात संजूला काही मॅच दुखापतींमुळे मुकला, तर उरलेल्या सामन्यांमध्ये त्याला मधल्या फळीत खेळावं लागलं, कारण राजस्थानने वैभव सूर्यवंशीला ओपनिंगला खेळवण्याचा निर्णय घेतला. संजूचे राजस्थानसोबत मतभेद व्हायचंहेदेखील एक कारण असल्याचं समोर आलं आहे.
टीम इंडियाचा माजी ओपनर आकाश चोप्रा यानेही संजूच्या राजस्थान रॉयल्स सोडण्याच्या भूमिकेमागे वैभव सूर्यवंशीला ओपनिंगला पाठवणं कारणीभूत असल्याचे संकेत दिले आहेत. आकाश चोप्राने त्याच्या युट्युब चॅनलवरून या सगळ्या वादावर भूमिका मांडली. 'संजूला राजस्थानची साथ का सोडायची आहे? मेगा ऑक्शन झाला तेव्हा राजस्थानने जॉस बटलरला जाऊ दिलं, कारण संजूला ओपनिंग करायची होती. संजू आणि राजस्थानमध्ये चांगली अंडरस्टॅण्डिंगही होती', असं आकाश चोप्रा म्हणाला.
advertisement
'मला वाटलं की खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करण्यात संजूचं मोठं योगदान असेल, पण आता तसं वाटत नाही. वैभव सूर्यवंशी आला आहे, त्यामुळे दोन ओपनर आधीपासूनच तयार आहेत, आणि तुम्ही ध्रुव जुरेललाही वर बॅटिंगला पाठवू शकता, त्यामुळे संजूला सोडायचं आहे. हा माझा अंदाज आहे, त्याच्यात आणि राजस्थानमध्ये नेमकं काय सुरू आहे? हे मला माहिती नाही', असंही आकाश चोप्राने स्पष्ट केलं आहे.
संजू सॅमसन बराच काळ राजस्थान रॉयल्ससोबत आहे. तसंच तो राजस्थानचा सर्वाधिक रन करणारा खेळाडूही आहे. याशिवाय त्याने राजस्थानची कॅप्टन्सीही केली आहे. चेन्नई सुपरकिंग्स आणि केकेआर संजू सॅमसनला टीममध्ये घेण्यासाठी उत्सुक असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. आयपीएलच्या नियमानुसार टीम खेळाडूला पुढच्या मोसमाआधी ट्रेड करू शकते किंवा रिलीज करू शकते.