पुढे अनेक दवाखाने आणि डॉक्टरांचे सल्ले घेतले. यातून मोनिकाला कमकुवत आणि ठिसूळ हाडांचे दिव्यांगत्व असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय कमकुवत हाडे असल्याने वारंवार फ्रॅक्चर होत होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार आणि वेळोवेळी ऑपरेशन्स करून देखील उभे राहण्याइतके साधे दुखणे नव्हते. ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा (OI) या आजारामुळे मोनिका कधीच स्वतःच्या पायावर उभी राहू शकणार नव्हती. परंतु लहानपणापासूनच अभ्यासाची आवड आणि घरच्यांनी निर्माण केलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर मोनिका आर्थिकदृष्ट्या मात्र स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी राहिली.
advertisement
सांगली जिल्हा बँकेत नोकरी
सन 2018 हे मोनिकाच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष ठरले. 2018 ला मोनिका जी.डी.सी. परीक्षा उत्तीर्ण झाली. आणि 2019 सालापासून सांगली जिल्हा बँकेमध्ये क्लर्क पदावर सेवा बजावत आहे. गेल्या सहा वर्षांपासून राहत्या गावामध्ये सांगली जिल्हा बँकेच्या ओझर्डे शाखेमध्ये ती कार्यरत आहे. मोनिका दिव्यांग असली तरी तिने बँक सेवेतील आवश्यक प्रत्येक कौशल्य आत्मसात केले आहे. तिच्यामध्ये क्लर्क पदावरील कामाची तत्परता आणि उत्साह नेहमी जाणवत असल्याचे बँकेतील सहकारी सांगतात.
जिद्दीने केले शिक्षण पूर्ण
मोनिकाने एम्.कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ऊन-वारा-पाऊस कशाचीही परवा न करता काकांनी शाळेच्या बेंचपर्यंत पोहोचवले. कामांमुळेच शिक्षण पूर्ण केल्याचे मोनिका कृतज्ञतेने सांगते. मोनिकाचे आई-वडील, काका-काकू शिक्षणाचे महत्त्व पहिल्यापासूनच जाणत होते. अशातच मुलीला असलेली अभ्यासाची आवड त्यांनी ओळखली. आणि दररोज नव्या संकटाचा जिद्दीने सामना करत मुलीचे शिक्षण पूर्ण केले.
जगण्याचे बळ
मोनिकाची हाडे ठिसूळ असल्याने वारंवार फ्रॅक्चर्स होत होते. शालेय वयात दोन-चार महिन्याला नवे फ्रॅक्चर्स होत असल्याने शाळेत कमी आणि हॉस्पिटलच्या बेडवर अधिक काळ घालवल्याचे वेदनादायी प्रसंग मोनिकाने सोसले. अशा कठीण प्रसंगी नव्या उमेदीने जगण्याची प्रेरणा आणि आत्मविश्वास वडिलांनी निर्माण केल्याचे मोनिका अभिमानाने सांगते. निसर्गाने आपल्याला काय कमी दिले याचा विचार करून दुःख करण्यापेक्षा; निसर्गाने जे दिले आहे त्याचा वापर करून आयुष्य शक्य तितके सुखी आणि समाधानी जगण्याचा प्रयत्न करते असे मोनिका आवर्जून सांगते.
डोंगराएवढ्या संकटांना तोंड देणारे कुटुंब मोनिकाला बँकेतील खुर्चीपर्यंत पोहोचवते. तसेच जिद्दीचे बाळकडू मिळालेले मोनिकाचे लहान भाऊ-बहीण देखील रोजच्या जगण्यामध्ये सावलीप्रमाणे एकमेकांसोबत आहेत. एकत्रित कुटुंबात चार जण दिव्यांग असून प्रामाणिक मेहनतीसह सकारात्मकतेने राहतात. लोहार कुटुंबाच्या एकीसह आयुष्याकडे अत्यंत सकारात्मकपणे पाहणारी, जन्मताच असणाऱ्या दिव्यांगत्वाला जिद्दीने टक्कर देत आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी राहणारी मोनिका प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरते आहे.