TRENDING:

'एक व्यक्ती जिवंत आहे, पण...' चंदेरी किल्ल्यावर रेस्क्यू थराराची INSIDE STORY

Last Updated:

'खाली त्याचे आई-वडील आणि ॲम्ब्युलन्स तयार होती. आईने मुलाला स्ट्रेचरवर पाहताच डोळ्यांत अश्रू आले, पण गणेश व सर्वांनी त्यांना धीर दिला'

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निसर्ग मित्र पनवेल संस्थेनं आजपर्यंत अनेक बचाव कार्य, शोध मोहिमा आणि रिकव्हरी ऑपरेशन्स यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. रिकव्हरी म्हणजे व्यक्ती जिवंत नसल्याची खात्री असताना डोंगरातून किंवा पाण्यातून मृतदेह बाहेर काढणे. शोध मोहीम म्हणजे विस्तीर्ण जंगलात हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणे. बचाव कार्य म्हणजे व्यक्ती जिवंत आहे, पण जखमी आहे किंवा चालू शकत नाही अशा स्थितीत त्याला सुरक्षित ठिकाणी आणणे. अनेक वेळा शोध आणि बचाव, तसंच शोध, रिकव्हरी ही कामे एकत्रच करावी लागतात.
News18
News18
advertisement

चंदेरी किल्ला गुहेपर्यंतचा ट्रेक मध्यम श्रेणीचा असला, तरी प्रचंड चढ असल्यामुळे तो दमछाक करणारा आहे. गुहेपासून किल्ल्याच्या माथ्यापर्यंतचा भाग मात्र कठीण श्रेणीत मोडतो. साधारणपणे गुहेपर्यंत २ ते ३ तास लागतात आणि गुहेपासून टॉपपर्यंत आणखी १ तास. चंदेरी किल्ला निसर्गमित्रांसाठी रस्त्याने आणि मनानेही खूप जवळचा आहे. येथे प्रस्तरारोहणाच्या (Climbing) तीन मोहिमा झालेल्या आहेत आणि त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर प्रसिद्ध आहेत. अनेक वेळा ट्रेक झालेले असल्याने किल्ल्याच्या वाटांबाबत अगदी अंधाऱ्या रात्रीही निश्चिंतपणे जाता येईल असा विश्वास आहे.

advertisement

चंदेरीला दोन मुख्य वाटा आहेत 

एक पनवेलकडून तामसई गावातून आणि दुसरी बदलापूरकडून चिंचोली गावातून. पनवेलची वाट तुलनेने सोपी, तर चिंचोलीकडील वाट दगडाळ आणि अधिक चढाची आहे. या वर्षातील चंदेरीवरील पहिला रेस्क्यू (रिकव्हरी) २ जानेवारी रोजी लोणावळ्याचे गणेश गिध व बदलापूरचे हेमंत जाधव आणि त्यांच्या टीमने केला होता. त्या मोहिमेत मृत व्यक्तीला बदलापूर–चिंचोली मार्गे खाली उतरवण्यात आले होते. ५ तारखेला झालेला रेस्क्यू मात्र खरा बचाव कार्य होता. दुपारी २.३० वाजता फक्त एवढाच संदेश मिळाला –

advertisement

“एक व्यक्ती जिवंत आहे, पाय तुटलेला आहे, चालू शकत नाही. त्याच्यापर्यंत पाणी पोहोचवले आहे.”

त्याव्यतिरिक्त वय, नाव, नेमकी जागा अशी कोणतीही माहिती नव्हती. एक टीम आधीच पुढे निघाली होती. लोणावळ्याहून गणेश निघाला. निसर्गमित्र रेस्क्यू टीमला मेसेज मिळताच पराग आणि विश्वेश ऑफिसमधून निघाले. विशाल खोंड्यातील कॅम्पवरून २.४५ ला घरी पोहोचून ३.१५ ला निघाला. रवी नेरूळहून निघाला. सागरची नाईट शिफ्ट असूनही तो घरी असल्याने लगेच आला. मी देखील एक काम पुढे ढकलून निघालो.

advertisement

साधारण ४.३० वाजता गणेश आणि त्याची टीम तामसई गावात भेटली तिथेच पोलिस पाटील सुद्धा उपस्थित होते वेळ न घालवता गावकऱ्यांना कल्पना देऊन वरच्या दिशेने निघालो.

४.४५ ला चढाई सुरू झाली. ६.१५ ते ६.४५ दरम्यान सर्वजण वर पोहोचलो. चढताना विश्वेशच्या अंगठ्याला ठेच लागली होती, त्यामुळे थोडा वेग कमी झाला, पण तरीही दोन तासांत आम्ही गुहेपर्यंत पोहोचलो. या दुखापतीचा रेस्क्यूवर कुठलाही परिणाम त्याने होऊ दिला नाही. उलट, स्वतःच्या वेदना विसरून तो जोमाने काम करत होता.

advertisement

बदलापूर टीम मधील दर्शन रोपच्या साहाय्याने त्या मुलापर्यंत पोहोचत त्याची विचारपूस केली. तसंच त्याच टीम मधील मिहीर जाधवने रोप सेटअप तयार ठेवले होते.

गणेश गीध सुद्धा रोप च्या साह्याने त्याच्या पर्यंत पोहचला त्याला स्ट्रेचरवर ठेवून नीट बांधले आणि रोपला अटॅच करून सगळ्यांनी मिळून रोप खेचत त्याला पॅचपर्यंत आणले. तिथून अरुंद वाटेने वर आणणे अजून बाकी होते, पण वाट असल्यामुळे सर्वांनी स्ट्रेचर हातात घेतले आणि त्याला गुहेपर्यंत सुरक्षित आणले. तेव्हा रात्री ९.३० वाजले होते.सगळे साहित्य आवरून प्रत्येकाने आपल्या बॅगेत भरले. थोडा खाऊ एकत्र बसून खाल्ला. पोलीस आणि मुलाचे पालक चिंचोलीकडे असल्याने तिथून उतरवण्याचा फोन आला होता, पण तो मार्ग अधिक उतरवण्यासाठी धोकादायक असल्याने सर्वांनी एकमताने निर्णय घेतला – तामसई गावातूनच उतरवायचे.

रात्री साधारण १० वाजता पनवेलकडील तामसई मार्गे स्ट्रेचरवर मुलाला घेऊन उतरायला सुरुवात केली. डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्याला झोपू द्यायचे नव्हते, म्हणून सतत त्याच्याशी बोलत होतो. त्याचे नाव अश्विन आचरेकर, राहायला सांताक्रूझ. BSc 2nd Year ला आहे. तो बॅगेवर घसरून पडला आणि नंतर नितंब आणि पायावर जोरात आदळला. पायाच्या अँकलला फ्रॅक्चर, पाठीला दुखापत आणि डोक्याला किरकोळ जखम होती.

दुखण्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून मध्ये मध्ये जोक, गप्पा, मस्ती करत आम्ही त्याला खाली उतरवत होतो. “परत ट्रेक करशील का?” असे विचारल्यावर त्याने “हो” असे उत्तर दिले. वय फक्त १९, पण जिद्द मात्र जबरदस्त.

उतरवण्यासाठी चार जण लागायचे, ते एकमेकांत बदलत होतो. दगड, घसरडी वाट, अरुंद पायवाट, एका बाजूला दरी, तर दुसरीकडे काटेरी झाडे – सगळे सांभाळत उतरवणे खूप जोखमीचे होते.

सागर पहिल्यांदाच रेस्क्यूमध्ये सहभागी झाला होता, पण त्याचे काम खरंच कौतुकास्पद होते. अर्ध्या वाटेपर्यंत तामसई गावातील एक तरुणही मदतीला आला. खरं तर पूर्ण टीमशिवाय हे कार्य अशक्यच होते. प्रत्येक जण आपापली पुर्ण ताकद लाऊन उतरवण्या साठी मदत करत होते.

तब्बल ५.३० तासांची तगमग, काटेकुटे अंगावर घेत, हेडटॉर्चच्या प्रकाशात आम्ही अश्विनला खाली आणले. खाली त्याचे आई-वडील आणि ॲम्ब्युलन्स तयार होती. आईने मुलाला स्ट्रेचरवर पाहताच डोळ्यांत अश्रू आले, पण गणेश व सर्वांनी त्यांना धीर दिला – “तुमचा मुलगा खूप नशिबवान आहे.”

अश्विन आणि त्याच्या आई-वडिलांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. खाली चहाची व्यवस्था केली होती. अश्विनसोबत आलेले त्याचे दोन मित्रही आमच्यासोबतच उतरले आणि त्यांनीही आभार व्यक्त केले. अश्विनला ॲम्ब्युलन्समध्ये सुपूर्त करून आम्ही साधारण पहाटे ४.३० वाजता घरच्या वाटेला लागलो.

आता सागरला नाईट शिफ्टसाठी उशीर झालाच होता, पराग आणि विश्वेशला दोन तीन तासांनी ऑफिस गाठायचे होते, रवीला अंबरनाथला साईटवर जायचे होते, विशालला पुन्हा कॅम्पवर परतायचे होते, आणि मलाही काम होते. सगळे पुन्हा आपल्या रोजच्या शेड्युलला लागलो.

विशेष म्हणजे, एक दिवस आधी म्हणजे 4 जानेवारीला निसर्गमित्र संस्थेला श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) तर्फे रेस्क्यूमधील योगदानासाठी वीर तानाजी मालुसरे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते आणि लगेचच दुसऱ्या दिवशी असा कठीण रेस्क्यू… अशा शाबासक्या आणि गौरवामुळेच रेस्क्यू करत राहण्याची जिद्द वाढते. कितीही बिझी शेड्युल असलं तरी वेळ काढावासा वाटतो.

खरं तर रेस्क्यू कॉल यायलाच नकोत. पण डोंगरात अपघात झालेच, तर धावून जाणं आपलं कर्तव्य आहे. नाहीतर गिर्यारोहण धर्म कसा वाढणार? सह्याद्री तितुका मेळवावा, गिर्यारोहण धर्म वाढवावा.

चंदेरी रेस्क्यूला असणाऱ्या संस्था व कार्यकर्ते.

निसर्गमित्र पनवेल (सागर बामणे, अक्षय गायकर, रवी खोसे, विशाल पाटील, विश्वेश महाजन, पराग सरोदे)

डेला रेस्क्यू लोणावळा (गणेश गिध, अरमान मुजावर, राहुल देशमुख, विनायक गोपाळे, आकाश अंभुरे)

हेमंत जाधव व मिहीर हेमंत जाधव बदलापूर

रक्षा रेस्कु टीम कर्जत (सुमित गुरव, ऋषी कोळंबे, अमोघ काळे)

शिवगर्जना गिरिभ्रमण कल्याण (साहस बोबडे)

प्रमीत अँडव्हेंचर भांडुप (मितेश मोमाया)

यशवंती हायकर्स खोपोली ( शुभम पाटील )

सह्याद्री रॉक अँडव्हेंचर बदलापूर (दर्शन देशमुख)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, सोयाबीन दर घसरले,तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

लेखक - अक्षय गायकर ( निसर्ग मित्र, पनवेल)

मराठी बातम्या/ठाणे/
'एक व्यक्ती जिवंत आहे, पण...' चंदेरी किल्ल्यावर रेस्क्यू थराराची INSIDE STORY
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल