पौंडपाडा भागातील पहाडी बाबा मंदिराजवळ 4 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास कुणाल देसले आणि त्याचे काही साथीदार सार्वजनिक ठिकाणी दारू पित बसले होते. यावेळी स्थानिक रहिवासी रेणू मौर्या (वय 36) यांनी त्यांना दारू पिण्यास अटकाव केला. याच गोष्टीचा राग मनात धरून कुणाल देसले व त्याच्या टोळीने रेणू मौर्या यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. या घटनेनंतर रेणू आणि त्यांचे टेलरकाम करणारे पती प्रेमचंद मौर्या (वय 40) यांनी कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
advertisement
आता हद्दच झाली! थेट पोलिसाकडेच मागितली 15 लाखांची खंडणी, कारण धक्कादायक, सोलापूरची घटना
पोलिसांत तक्रार केल्याचा बदला घेण्यासाठी त्याच दिवशी रात्री कुणाल देसले याच्यासह करण, प्रेम शहा, प्रमोद विश्वकर्मा, फिरोज, लक्ष्मण विश्वकर्मा, प्रथम, अब्दुला, दीपेश कांबळे, हमीद आणि सुयोग अशा 12 जणांच्या टोळीने मौर्या यांच्या घरात घुसखोरी केली. आरोपी पेट्रोलने भरलेल्या बाटल्या घेऊन घरात शिरले आणि कुटुंबीयांना शिवीगाळ करत लोखंडी पाइप व काठ्यांनी मारहाण सुरू केली.
या हल्ल्यात रेणू मौर्या यांच्यासह त्यांची मुले कृष्णा (15) आणि अंशिका (10) यांनाही मारहाण करण्यात आली. यावेळी कुणाल देसले याने प्रेमचंद मौर्या यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड ऐकून मदतीला आलेल्या शेजारील रहिवाशांनाही आरोपींनी अमानुषपणे मारहाण केली. तसेच इतर घरांना बाहेरून कडी लावून मदतीला येणाऱ्यांना अडवण्यात आले.
या गंभीर प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात 5 जानेवारी रोजी 12 आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.






