रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराणने इराक, कुवेत, संयुक्त अरब अमिराती, कतार, तुर्की आणि बहरीन यांना इशारा दिला आहे की जर त्यांनी त्यांच्या हवाई क्षेत्राचा वापर अमेरिकेला करू दिला, तर त्याचे गंभीर परिणाम होतील. अधिकाऱ्याने सांगितले की, इराणने अमेरिकेसोबत थेट अणु करारावर बोलणी करण्यास नकार दिला आहे. परंतु ओमानच्या माध्यमातून अप्रत्यक्ष बोलणी सुरू ठेवण्याची त्यांची इच्छा आहे.
advertisement
7 मार्च रोजी ट्रम्प यांनी सांगितले होते की त्यांनी खामेनेई यांना चर्चेसाठी प्रस्ताव पाठवला होता. 30 मार्च रोजी अमेरिकेच्या नेत्याने म्हटले की जर बोलणी अयशस्वी झाली. तर ते 2 आठवड्यांत इराणवर अतिरिक्त कर लावतील. मात्र जर इराणने त्यांचे ऐकले नाही, तर बॉम्बचा वर्षाव होईल, असेही ते म्हणाले होते.
शेजारील मुस्लिम देशांना इशारा
याला उत्तर देताना खामेनेई म्हणाले की, त्यांना अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपावर विश्वास नाही. परंतु त्यांनी इशारा दिला की इराणमध्ये अशांतता निर्माण करण्याच्या वॉशिंग्टनच्या कोणत्याही प्रयत्नाला ते हाणून पाडतील. यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये इस्रायलने इराणच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले केले होते. ज्याच्या प्रत्युत्तरात इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी जोरदार पलटवार केला होता.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, खामेनेई यांनी अलीकडेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला इस्रायलवर जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी करण्याचे निर्देश दिले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही दावा केला होता की त्यांच्या हल्ल्यांमुळे इराणची हवाई सुरक्षा प्रणाली कमकुवत झाली आहे. यामुळे इराणला स्वतःच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे. मध्य पूर्वेतील जाणकारांचे मत आहे की खामेनेई यांचे हे पाऊल इस्रायलला हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे की इराण कोणत्याही आक्रमकतेला कठोर प्रत्युत्तर देईल.
हवाई क्षेत्र बंद करण्याच्या बातम्या
इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे आणि सैन्याला अलर्टवर ठेवले आहे, अशा बातम्याही समोर येत आहेत. मेहर न्यूज एजन्सीच्या हवाल्याने एका X युझरने लिहिले आहे की, अमेरिकेच्या धमक्यांनंतर इराणने हवाई क्षेत्र बंद केले आणि सैन्याला तयार राहण्यास सांगितले आहे. हे पाऊल दर्शवते की इराण अमेरिका आणि त्याचे मित्र इस्रायल यांच्याकडून एकाच वेळी धोक्याची शक्यता गृहीत धरत आहे. इराणच्या या निर्णयात लेबनॉन आणि हिजबुल्लाहची भूमिकाही महत्त्वाची आहे. इस्रायलने अलीकडेच हिजबुल्लाहच्या अनेक कमांडरांना लक्ष्य केले. ज्यात इराण समर्थित नेते हसन नसरल्लाह यांच्या हत्येचाही समावेश आहे. इराण याला आपल्या प्रादेशिक ताकदीवरचा हल्ला मानतो.
घरगुती दबावाला तोंड देण्याची रणनीती?
इराणच्या आतही खामेनेई यांच्यावर दबाव वाढत आहे. त्यांचे वय (85 वर्षे) आणि आरोग्याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की त्यांनी आपला मुलगा मोजतबा खामेनेई याला उत्तराधिकारी म्हणून निवडले आहे. ज्यामुळे अंतर्गत स्थिरता राखण्याचा प्रयत्न दिसत आहे. अशा परिस्थितीत सैन्याला हाय अलर्टवर ठेवणे केवळ बाह्य धोक्यांचा सामना करण्याची रणनीती नाही. तर देशांतर्गत एकता आणि ताकदीचा संदेश देणे देखील आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील ही वाढती तणावाची परिस्थिती गंभीर बनली आहे.
