या पार्श्वभूमीवर ग्रीनलँडमध्ये धार्मिक रचना कशी आहे. तसेच तिथे हिंदू किंवा मुस्लिम समुदाय वास्तव्यास आहेत का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
ग्रीनलँडमध्ये ख्रिश्चन धर्माचे वर्चस्व
ग्रीनलँडमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रभाव प्रचंड आहे. येथील सुमारे 95 ते 96 टक्के लोकसंख्या स्वतःला ख्रिश्चन मानते. यामध्ये मोठा हिस्सा इव्हॅंजेलिकल लूथरन चर्चचा आहे, जे डेन्मार्कचे राष्ट्रीय चर्चही आहे. हा धार्मिक प्रभाव डेन्मार्कच्या वसाहतवादी इतिहासाशी आणि शतकांपूर्वी सुरू झालेल्या मिशनरी कार्याशी जोडलेला आहे. आजही ग्रीनलँडमधील लहान शहरे आणि वसाहतींमध्ये चर्च सामाजिक आणि सांस्कृतिक आयुष्याचा केंद्रबिंदू मानले जातात.
advertisement
मुस्लिम लोकसंख्या किती?
ग्रीनलँडमध्ये मुस्लिम नागरिक आहेत, मात्र त्यांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. एकूण लोकसंख्येच्या एक टक्क्याहूनही कमी लोक मुस्लिम आहेत. अनेक वर्षांपर्यंत ग्रीनलँडमध्ये केवळ एकच सार्वजनिकरीत्या ओळखला जाणारा मुस्लिम रहिवासी असल्याचे उल्लेख आढळतात. अलीकडच्या काळात काही परदेशी कामगार, विद्यार्थी किंवा व्यावसायिकांमुळे ही संख्या थोडी वाढली असण्याची शक्यता आहे. तरीही येथे ना संघटित मुस्लिम समाज आहे, ना मशिदी किंवा स्वतंत्र धार्मिक पायाभूत रचना.
हिंदू समुदाय...
ग्रीनलँडमध्ये कोणताही मोठा किंवा स्थिर हिंदू समुदाय अस्तित्वात नाही. अधिकृत लोकसंख्या आकडेवारी आणि शैक्षणिक अभ्यासांनुसार येथे संघटित हिंदू समाज आढळत नाही. ग्रीनलँडचे दुर्गम स्थान, कठोर हवामान आणि अत्यंत कमी लोकसंख्या ही यामागची प्रमुख कारणे मानली जातात.
परंपरांचा ठसा अजूनही
ख्रिश्चन धर्माचा प्रभाव असला तरी ग्रीनलँडमध्ये पारंपरिक आध्यात्मिक श्रद्धा आजही पाहायला मिळतात. निसर्ग, आत्मा आणि पूर्वजांशी निगडित या मान्यतांचा आज फार कमी लोक सक्रियपणे अवलंब करतात. मात्र सांस्कृतिक वारशाचा भाग म्हणून या परंपरांचा सन्मान केला जातो. याशिवाय ग्रीनलँडमधील सुमारे दोन ते अडीच टक्के लोकसंख्या स्वतःला नास्तिक किंवा गैर-धार्मिक मानते. डेन्मार्क आणि इतर नॉर्डिक देशांप्रमाणेच येथेही धर्मनिरपेक्षतेचा कल वाढताना दिसतो, विशेषतः तरुण पिढीत.
सध्या ग्रीनलँडची एकूण लोकसंख्या 56,500 ते 57,000 इतकी आहे. इतक्या कमी लोकसंख्येमुळे येथे धार्मिक विविधता मर्यादित स्वरूपाची आहे आणि त्यामुळेच ग्रीनलँड जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशांपैकी एक मानले जाते.
