छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरा भागांमध्ये गोपिका ज्वेलर्स आहे. या ज्वेलर्समध्ये एक आजी-आजोबा सोनं खरेदीसाठी आले होते. या ठिकाणी त्यांच्यात झालेला संवाद दुकानाचे मालक निलेश खिवांसरा यांनी मोबाईल कॅमेरात कैद केला आणि तो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला.
आजीला घ्यायचं होतं मंगळसूत्र
निलेश सांगतात की, “सर्वात पहिले ते आजी-आजोबा आमच्या पहिल्या दुकानात आले होते. त्या ठिकाणी त्यांनी मंगळसूत्र बघत होते. मी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर कामानिमित्त मी बाहेर आलो. जेव्हा मी परत दुकानात आलो तेव्हा ते आजी-आजोबा निघून गेले होते. त्यानंतर मला वाईट वाटलं की मला त्यांच्याशी बोलता नाही आलं. त्यानंतर दोन तासांनंतर तेच आजी-आजोबा आमच्या दुसऱ्या शाखेमध्ये आले.”
advertisement
Same Sex Marriage: राम आणि श्याम लग्नबंधनात, पुण्यात 20 वर्षांनी झाला अनोखा विवाह
मंगळसूत्राची किंमत विचारली
“आजोबा आजीसाठी मंगळसूत्र बघत होते. तेव्हा मी त्यांच्यासोबत बोलण्यासाठी गेलो आणि त्या आजोबांना विचारलं तुम्ही मला ओळखलं का? तेव्हा त्यांनी हो सांगितलं. त्यांना एक मंगळसूत्र आवडलं होतं, त्याची किंमत त्यांनी मला विचारली आणि जवळचे पैसे काढून दिले. पण मी त्यांना मला एवढे पैसे नको म्हणून सांगितलं. परंतु, त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांना वाटलं की मला अजून पैसे पाहिजेत. त्यांनी आजीकडून पैसे मागून घेतले आणि मला दिले,” असं निलेश सांगतात.
फक्त 20 रुपये घेतले
“आजी-आजोबांकडे मिळून बाराशे ते तेराशे रुपये होते. पण मी ते पैसे घेतले नाही. तर त्यांना माळ आणि मंगळसूत्राच्या वाट्या तशाच देऊन टाकल्या. पण ते दोघे तसं घ्यायला तयार नव्हते. म्हणून मी त्यांच्याकडून 20 रुपये घेतले आणि ते पैसे मी अजून सुद्धा जपून ठेवले आहेत,” असं दुकान मालकाने सांगितले आहे.
अन् दोघे हसायला लागले.
“मी जेव्हा त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत, तेव्हा ते दोघेही खूप भावूक झाले. त्यांनी त्यांच्या मृत्यू झालेल्या मुलाची आठवण काढली. तेव्हा त्यांना हसवण्यासाठी ‘आजी-आजोबांचं तुमच्यावरती प्रेम आहे का?’ असा प्रश्न केला. तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली आणि दोघे हसायला लागले. हे बघून मला सुद्धा खूप आनंद झाला, असेही दुकानदार निलेश यांनी सांगितले.





