डॉक्टर नज्जर असं या दुर्दैवी डॉक्टर आईचं नाव आहे. गाझा इथल्या रुग्णालयात ती काम करते. सध्या गाझात संघर्ष सुरू आहे. गाझा येथील रुग्णालयात डॉक्टर नज्जर जखमींवर उपचार करण्यासाठी गेल्या. पण काही तासांनंतर तिच्याच सात मुलांचे जळालेले मृतदेह त्याच रुग्णालयात आले.
गाझा सिव्हिल डिफेन्सच्या मते, ही मुले त्यांच्या घरावर इस्रायली हवाई हल्ल्यात मारली गेली. सर्वात मोठा मुलगा 12 वर्षांचा होता आणि सर्वात धाकटा फक्त 3 वर्षांचा होता. आणखी दोन मुलं, एक 7 महिन्यांचा आणि एक 2 वर्षांचा ढिगाऱ्याखाली गाडले गेले. सीएनएनच्या वृत्तानुसार, डॉ. नज्जर यांचं फक्त एकच मूल जिवंत आहे. तोही गंभीर जखमी झाला आहे. तिचा नवराही डॉक्टर आहे. तोसुद्धा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला.
advertisement
गाझाच्या आरोग्य मंत्रालय आणि नागरी संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की, खान युनूस परिसरातील त्यांच्या घरी हा हल्ला झाला. इस्रायली सैन्याने म्हटलं आहे की त्यांनी त्यांच्या सैन्याजवळील इमारतीतून काम करणाऱ्या काही संशयितांना लक्ष्य केलं. लष्कराने असंही म्हटलं आहे की ते नागरिक मारले गेल्याच्या दाव्याची चौकशी करत आहेत.
गाझा सिव्हिल डिफेन्सने हल्ल्याच्या ठिकाणाहून एक हृदयद्रावक व्हिडिओ जारी केला. यामध्ये वैद्यकीय पथक एका जखमी व्यक्तीला स्ट्रेचरवर घेऊन जाताना दाखवण्यात आले. काही लोक जळत्या घरात आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. अनेक मुलांचे जळालेले मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना पांढऱ्या चादरीत गुंडाळण्यात आले. हे दृश्य कोणाचेही हृदय पिळवटून टाकू शकते.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक मुनीर अल-बरश म्हणाले की, हल्ला झाला तेव्हा डॉ. नज्जर यांचे पती नुकतेच घरी परतले होते. त्यांनी X वर लिहिलं, त्याच्या 9 मुलांना मारण्यात आलं. याह्या, राकान, रसलान, जिब्रान, हव्वा, रिवाल, सय्यदान, लुकमान आणि सिद्रा. तिचा नवरा आयसीयूमध्ये आहे. ते म्हणाले की हे गाझामधील आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वास्तव आहे. शब्दात वेदना व्यक्त करणे कठीण आहे. गाझामध्ये केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य केले जात नाही तर इस्रायली आक्रमणामुळे संपूर्ण कुटुंबे नष्ट होत आहेत.
डॉ. नज्जर यांची कहाणी गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षाचे भयानक वास्तव उलगडते. एकीकडे, तिने इतरांचे प्राण वाचवण्यासाठी दिवसरात्र कष्ट केले, तर दुसरीकडे तिचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्यांच्या मुलांचे हास्य, त्यांची स्वप्ने, सर्व काही ढिगाऱ्यात गाडली गेली. वाचलेलं मूलदेखील जीवन आणि मृत्यूची लढाई लढत आहे.