तीसमार खान या नावाशी अनेक दंतकथा जोडल्या गेल्या आहेत. त्यातली सगळ्यात विश्वासार्ह दंतकथा ही 1869 ते 1911 या काळात हैदराबादचा सहावा निजाम म्हणून राज्य केलेल्या मीर महबूब अली खान याच्याशी जोडलेली आहे. त्या काळात शिकारीवर बंदी नव्हती. राजे, महाराजे, नवाब आणि निजाम हे जंगलात शिकारीला जात असत. त्यांचा तो आवडीचा छंदच होता. मीर महबूब अली खान यालाही शिकारीचा छंद होता. आपल्या राज्यात कितीतरी वेळा कॅंप लावून तो कित्येक दिवस शिकार करत असे.
advertisement
मीर महबूब अली खान याने 1869 नंतर गादीवर असेपर्यंत आपल्या राज्यातील 30 वाघांची शिकार केली. त्या काळात हे मोठ्या बहादुरीचं लक्षण मानलं जात असे. त्याच्या या कर्तृत्वामुळे तो तीसमार खान म्हणजे तीस प्राणी मारणारा या नावाने ओळखला जाऊ लागला. महबूब अली हा फक्त शिकारीसाठीच नव्हे तर उर्दू, फारसी आणि अरबी साहित्यातील जाणकार म्हणून ज्ञात होता. कविता लिहिणं, मैफलींमध्ये त्या सादर करणं हे छंदही त्याला होते.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ च्या रिपोर्टनुसार निजामाच्या परिवारात अनेकांना शिकारीचा छंद होता. मीर महबूब अलीचे आजोबा आझम जाह हे कसलेले शिकारी होते. मीर महबूब अली आजोबांच्या एक पाऊल पुढे गेले आणि 1935 मध्ये अवघ्या 33 दिवसांत त्यांनी 35 वाघांची शिकार केली.
‘तीसमार खान’ प्रमाणेच ‘फन्ने खान’ आणि ‘तुर्रम खान’ ही दोन विशेषणंही प्रसिद्ध आहेत. फन्ने खान हा मंगोल राजा चंगेज खान याच्या दरबारातील त्याचा एक विश्वासू सेवक आणि शिपाई होता. तो अनेक मोठमोठ्या बाता करत असे. खुशामती करण्याचा त्याचा स्वभाव होता. तो अत्यंत शक्तीशाली असल्याचे उल्लेख अनेक दस्तावेजांमध्ये आढळतात. युद्धातही तो एकटाच अनेक सैनिकांना पुरे पडत असे. त्याच्या धाडसी स्वभावामुळे तो प्रसिद्ध होता. त्यामुळे त्याचं नाव हेच हळूहळू म्हणीसारखं रुढ झालं. तुर्रम खानाची गोष्टही अशीच रंजक आहे. त्याचं खरं नाव तुर्रेबाज खान असं होतं. तो हैदराबादचा स्वातंत्र्य सैनिक होता. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात त्याने इंग्रजांविरुद्घ लढा दिला. हैदराबादचा निजाम ब्रिटिशांचा निकटवर्तीय असल्यामुळे तो निजामाच्या विरोधात होता. एकदा त्याने रात्रीच्या अंधारात इंग्रजांवर हल्ला केला मात्र त्याचा उद्देश सफल झाला नाही. नंतर त्याला पकडून त्याची हत्या करण्यात आली मात्र ‘तुर्रम खान’ हे धाडसी व्यक्तीसाठीचं नाव म्हणून रुढ झालं. याप्रमाणेच मराठेशाहीचा अंमल असलेल्या मुलुखात आजही एखादी मोठी कामगिरी करण्याचा आव आणणाऱ्याला उपरोधिकपणे ‘तू बाजीराव लागून गेलास का?’ असं विचारलं जातं त्याचा अर्थ मोठी कामगिरी करणं हे साध्या माणसाचं काम नाही.