अभिनेता कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांचे देखील खूप कौतुक होत आहे. कबीर खानने या पूर्वी ‘चक दे इंडिया’ आणि ‘83’ सारखे खेळांवर आधारित चित्रपट बनवले आहेत. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून एक व्यक्ती जोरदार चर्चेत आहे आणि ती म्हणजे या चित्रपटाचा नायक चंदू चॅम्पियन. कार्तिकने चंदूची भूमिका अप्रतिम साकारली आहे. प्रत्यक्षात चंदूने देशासाठी शरीरावर गोळ्या झेलल्या आणि देशासाठी सुवर्ण पदकदेखील जिंकलं.
advertisement
चंदू चॅम्पियनचं खरं नाव मुरलीकांत पेठकर आहे. त्यांचा जन्म नोव्हेंबर 1944 मध्ये महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर गावात झाला. मुरलीला लहानपणापासून खेळाची आवड होती. तसेच त्याचे सैन्यात भरती होण्याचे देखील स्वप्न होते. कुटुंबातील व्यक्ती मुरलीकांतला लाडाने चंदू म्हणायचे. मी एक दिवस चॅम्पियन बनेन, असं चंदू शाळेत असताना नेहमी म्हणायचा. त्यामुळे इतर मुलं त्याला ‘चंदू चॅम्पियन’ असं म्हणत. वयाच्या 12 व्या वर्षी चंदूने गावातील एका कुस्ती स्पर्धेत सरपंचाच्या मुलाला हरवलं. या विजयानंतर मुरलीकांतच्या कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात झाली. कुटुंबाला धमक्या मिळू लागल्या. या गोष्टींमुळे त्रस्त होत चंदू मालगाडीत बसून घर सोडून पुण्यात पळून आला. पुण्यात काही वर्षं राहिल्यावर त्याने भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला.
Sonakshi Zaheer Marriage: कोण आहे शत्रुघ्न सिन्हाचा होणारा जावई? जहीर इकबालची एकूण संपत्ती किती?
सैन्यात जाण्याचं स्वप्न पूर्ण झालं पण खेळाची आवड मुरलीकांतला शांत बसू देईना. त्यामुळे आवड म्हणून त्याने सैन्यात असताना बॉक्सिंग खेळणं सुरू केलं. तो बॉक्सिंग रिंगमध्ये दिवसरात्र मेहनत करू लागला. 20 वर्षाच्या मुरलीकांतला टोकियोतील आंतरराष्ट्रीय सर्व्हिसेस स्पोर्ट्स मीटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मी पदक जिंकून येणार असा विश्वास त्याने बटालियनला दिला आणि तो प्रत्यक्षात देखील आला. मुरलीने पदक जिंकत बटालियनसह देशाचे नाव उंचावलं.
टोकियोतून पदक जिंकून आल्यावर त्याच्या बटालियनने त्याला काही दिवसांसाठी जम्मू-काश्मीर येथील कँपमध्ये पाठवलं. मुरलीची बदली जम्मूतील सियालकोट आर्मी कँपमध्ये झाली. 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केला तेव्हा मुरली या कँपमध्ये होता. अंदाधुंद गोळीबारात त्याला नऊ गोळ्या लागल्या. पाय, छाती आणि डोक्यात गोळ्या लागल्याने मुरली गंभीर जखमी झाला. आजही एक गोळी त्यांच्या मणक्यात अडकलेली आहे. गोळ्या लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला, त्यावेळी सैन्याची एक जीप त्याच्या पायावरून गेली. इतर जखमी जवानांसह मुरलीला तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. या हल्ल्यात मुरलीला कमरेखाली अपंगत्व आलं. त्याची स्मृती गेली. शत्रुच्या गोळ्यांनी त्याच्या शरीराला दुखापत झाली पण त्याचा आत्मविश्वास तुटला नाही. कालपरत्वे त्याची स्मृती परत आली. जेव्हा त्याने स्वतःची अवस्था पाहिली तेव्हा आपण दुसऱ्यावर ओझं नाही बनायचं असा निश्चय केला. आजारातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांचा आत्मविश्वास पाहून डॉक्टरांनी त्याला भरपूर मदत केली. उपचारादरम्यान ते पोहायला शिकला. दोन वर्षांत मुरलीकांत चांगला बरा झाला. पण कायमचं अपंगत्व घेऊन ते रुग्णालयातून बाहेर पडला.
त्यानंतर त्यांनी स्वतःला क्रीडा क्षेत्रात झोकून दिले. सैन्यात असताना त्यांनी भालाफेक, डिस्कस थ्रो, वेटलिफ्टिंग, टेबल टेनिस आणि तिरंदाजी सारखे खेळ खेळले आणि महाराष्ट्राला चॅम्पियनशीप मिळवून दिली. 1969 मध्ये ते सैन्यातून निवृत्त झाले. त्यानंतर सगळं काही थांबल्याने ते निराश झाले. त्यांना काहीतरी करायचे होते. 1970 च्या सुरुवातीला टाटा ग्रुपने त्यांना मदतीचा हात दिला. जेव्हा टाटा ग्रुपचे अधिकारी मुरलीकांतला भेटायला गेले तेव्हा त्यांनी मला मदत न देता काहीतरी काम द्यावे असं सांगितलं. त्यांची ही वाक्य ऐकून अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले. त्यावरून टाटाने आपली सिस्टर कंपनी टेल्कोत मुरलीला नोकरी दिली. पुढे 30 वर्ष त्यांनी तिथं नोकरी केली.
नोकरी करताना क्रीडा क्षेत्रात काहीतरी करावं असं मुरलींना वाटत होतं आणि ते संधीची वाट पाहात होते. दिग्गज भारतीय क्रिकेटर विजय मर्चंट यांनी त्यांना संधी दिली. विजय मर्चंट यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर दिव्यांग खेळाडूंसाठी एक एनजीओ सुरू केली होती. त्यांना मुरलीकांत यांच्याविषयी माहिती मिळताच त्यांनी मदतीचा हात पुढे केला. 1972 मध्ये जर्मनीत होत असलेल्या समर पॅरॅलिम्पिकसाठी त्यांनी मुरलीकांतला प्रशिक्षण दिले आणि जर्मनीला जाण्यायेण्याचा सर्व खर्च केला. या पॅरॅलिम्पिक मध्ये मुरलीकांत यांनी स्विमिंगमध्ये विश्वविक्रम नोंदवला. भारतासाठी पॅरॅलिम्पिकमधलं पहिलं सुवर्ण पदक जिंकलं.
1972 मध्ये पॅरॅलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळाल्यावर मुरलीकांत जगभरात प्रसिद्ध झाले. जगभरात सन्मान मिळाला पण देशात सन्मान न झाल्याची खंत त्यांना वाटत होती. त्यांनी भारत सरकारला पत्र लिहित अर्जुन पुरस्कार देण्याची मागणी केली. पण ही मागणी फेटाळली गेली. मी दिव्यांग असल्याने सरकार माझ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मुरलीकांत यांनी केला. 2018 मध्ये मुरलीकांत यांना केंद्र सरकारकडून एक फोन आला. पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाल्याचे समजताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ते राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेले, तेव्हा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राष्ट्रपती रामनाथ कोविंदांपर्यंत सर्वांनी टाळ्यांचा गजरात त्यांचा सन्मान केला. याच मुरलीकांत पेठकरांची कहाणी आता मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाली आहे.