Ashadi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला आज पंढरपुरात नेमकं काय-काय करतात, असा रंगतो संपूर्ण सोहळा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ashadi Ekadashi 2025: वारकरी गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो दिवस आज उजाडला. आज आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये एक अभूतपूर्व आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशी हा पंढरपूर वारीचा मुख्य दिवस असतो.
पंढरपूर (सोलापूर) : वारकरी गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो दिवस आज उजाडला. आज आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये एक अभूतपूर्व आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशी हा पंढरपूर वारीचा मुख्य दिवस असतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी अनेक दिवसांपासून पायी चालत पंढरपूरमध्ये दाखल झालेले असतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज अशा अनेक संतांच्या पालख्या आणि दिंड्या या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचतात. हा सोहळा भक्ती, उत्साह आणि एकतेचे प्रतीक आहे. वारकऱ्यांचा उत्साह, पांडुरंगाची भेट हे सगळं वातावरण अवर्णनीय असतं.
चंद्रभागेमध्ये स्नान: आषाढी एकादशीला पहाटेपासूनच वारकरी चंद्रभागा नदीत (भीमा नदी) पवित्र स्नान करतात. चंद्रभागेत स्नान केल्याने पापक्षालन होते आणि विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी शरीर आणि मन शुद्ध होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. दशमीच्या रात्रीपासून ते एकादशीच्या दिवसभर चंद्रभागेत स्नानासाठी मोठी गर्दी असते.
शासकीय महापूजा: आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली जाते. ही पूजा शासनाच्या वतीने आणि शासनाच्या खर्चाने केली जाते. या पूजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकरी दाम्पत्यालाही पूजेचा मान मिळतो.
advertisement
विठ्ठलाचे दर्शन: लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगा लावतात. आषाढी एकादशीच्या दिवशी मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवले जाते. गर्दी खूप जास्त असल्याने अनेक वारकऱ्यांना प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेणे शक्य होत नाही, त्यामुळे ते कळसाचे दर्शन घेऊन किंवा चोखोबा आणि संत नामदेवाच्या पायरीवर माथा टेकवून समाधान मानतात.
advertisement
नामस्मरण आणि भजन-कीर्तन: पंढरपूरच्या रस्त्यांवर, मंदिरात आणि चंद्रभागेच्या घाटांवर दिवसभर "ज्ञानोबा माऊली तुकाराम", "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" या नामाचा अखंड गजर सुरू असतो. भजन-कीर्तन, अभंग आणि भारुडे सादर केली जातात, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय होऊन जाते.
advertisement
नगरप्रदक्षिणा: काही दिंड्या आणि वारकरी पंढरपूर शहराला प्रदक्षिणा घालतात, ज्याला नगरप्रदक्षिणा म्हणतात. जुन्या पंढरपूरला प्रदक्षिणा घालण्याची ही परंपरा आहे. वारकरी एकमेकांना प्रसाद वाटतात आणि उपवासाचे पदार्थ तयार करून सेवन करतात. वारीमध्ये सामुदायिक भोजनाची व्यवस्थाही असते. आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये येणारा प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर असतो. हा दिवस केवळ एक धार्मिक सण नसून, तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि एकोप्याचा एक मोठा उत्सव आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 06, 2025 8:19 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Ashadi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला आज पंढरपुरात नेमकं काय-काय करतात, असा रंगतो संपूर्ण सोहळा