Pandharichi Wari: युगे अठ्ठावीस विटेवरी उभा..! अठ्ठावीस युगं म्हणजे किती, विठ्ठल विटेवरच का आहे उभा?

Last Updated:

Pandharichi Wari 2025: 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' म्हणजे या ओळीचा अर्थ असा की, भगवान विठ्ठल अठ्ठावीस युगांपासून विटेवर उभे आहेत. 'युगे अठ्ठावीस' म्हणजे नेमका किती काळ, यामागे भारतीय कालगणनेचा संदर्भ सांगायचा झाल्यास हिंदू कालगणनेनुसार, सत्य (कृत), त्रेता, द्वापार आणि कली अशी चार युगे मिळून एक महायुग होते.

News18
News18
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरीत वैष्णवांचा मेळा भरू लागला आहे. रिंगण सोहळे उत्साहात पार करत पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी पंढरीच्या दिशेनं अखंड जयघोष करत चालले आहेत. वारी म्हणजे पंढरपूरच्या विठोबा-रखुमाईच्या दर्शनासाठी केली जाणारी सामूहिक पदयात्रा. आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला ही वारी होते. यापैकी आषाढी वारीला विशेष महत्त्व आहे, कारण या वारीत लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरला जातात. युगे अठ्ठावीस विठ्ठल विटेवर उभा आहे, असे सांगितले जाते. आरतीमध्येही पहिल्याच वाक्यात असा उल्लेख आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' म्हणजे या ओळीचा अर्थ असा की, भगवान विठ्ठल अठ्ठावीस युगांपासून विटेवर उभे आहेत. 'युगे अठ्ठावीस' म्हणजे नेमका किती काळ, यामागे भारतीय कालगणनेचा संदर्भ सांगायचा झाल्यास हिंदू कालगणनेनुसार, सत्य (कृत), त्रेता, द्वापार आणि कली अशी चार युगे मिळून एक महायुग होते. भागवत पुराणानुसार, सध्या 'वैवस्वत मन्वंतर' सुरू आहे. या मन्वंतरातील सध्याचे कलियुग हे २८ वे युग आहे. याचा अर्थ वैवस्वत मन्वंतरापासून विठ्ठल उभा आहे. तो अनादी काळापासून, म्हणजे सृष्टीच्या निर्मितीपूर्वीपासून किंवा अगदी सुरुवातीपासून तत्त्वरूपाने कार्यरत आहे, हे यातून सांगितले जाते. काही मतांनुसार, ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते; आणि हे सर्व पांडुरंगाचेच गुणगान करणारी आहेत, म्हणूनही विठ्ठल 'युगे अठ्ठावीस' उभा आहे, असे मानले जाते.
advertisement
भक्त पुंडलिकाची कथा -
विठ्ठल विटेवर उभा असण्यामागे भक्त पुंडलिकाची कथा अत्यंत प्रसिद्ध आहे. ही कथा मातृ-पितृ भक्तीचे महत्त्व सांगते. पूर्वी दिंडीरवन (आजचे पंढरपूर) येथे पुंडलिक नावाचा एक तरुण राहत होता. सुरुवातीला तो आपल्या आई-वडिलांना (जानुदेव आणि सत्यवती) योग्य वागणूक देत नव्हता, पण नंतर त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. चांगल्या संगतीमुळे तो बदलला आणि आपल्या वृद्ध आई-वडिलांची अत्यंत श्रद्धेने सेवा करू लागला. त्याची आई-वडिलांवरील भक्ती अद्वितीय होती.
advertisement
एकदा भगवान श्री हरी विष्णू रुसलेल्या रुक्मिणी मातेला शोधत दिंडीरवनात आले. त्यावेळी त्यांना आपल्या परमभक्त पुंडलिकाची आठवण झाली आणि त्याला भेटण्याची तीव्र इच्छा झाली. भगवंत स्वतः पुंडलिकाच्या झोपडीत त्याला भेटायला आले. ज्यावेळी भगवान श्रीहरी पुंडलिकाच्या दारात आले, त्यावेळी पुंडलिक आपल्या आई-वडिलांचे पाय चेपण्यात मग्न होता. देवांना दारात पाहून त्याला खूप आनंद झाला, पण त्याच वेळी त्याला एक धर्मसंकट पडले: जर तो देवाला भेटायला उठला, तर आई-वडिलांच्या सेवेत व्यत्यय येईल आणि जर नाही उठला, तर देवाचा अपमान होईल.
advertisement
पुंडलिकाने क्षणाचाही विलंब न लावता, आपल्या आई-वडिलांच्या सेवेला अधिक महत्त्व दिले. त्याने आपल्याजवळ पडलेली एक वीट देवापुढे भिरकावली आणि विनम्रपणे म्हणाला, "देवा, तुम्ही काही काळ या विटेवर उभे राहा. मी माझ्या आई-वडिलांची सेवा पूर्ण करून आलोच!"
advertisement
पुंडलिकाच्या मातृ-पितृ भक्तीने श्रीहरी अत्यंत प्रसन्न झाले. आई-वडिलांची सेवा ही स्वतःच्या सेवेपेक्षाही श्रेष्ठ आहे, हे पाहून भगवंताने पुंडलिकाच्या आज्ञेचे पालन केले आणि "कर कटेवरी' (कंबरेवर हात ठेवून) त्या विटेवर उभे राहिले. पुंडलिकाने सेवा पूर्ण केल्यावर त्याने देवाकडे वरदान मागितले की, त्यांनी भक्तांसाठी याच ठिकाणी, याच रूपात कायमचे उभे राहावे. तेव्हापासून भगवान विष्णू विठ्ठल रूपात पंढरपूरमध्ये विटेवर उभे आहेत.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Pandharichi Wari: युगे अठ्ठावीस विटेवरी उभा..! अठ्ठावीस युगं म्हणजे किती, विठ्ठल विटेवरच का आहे उभा?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement