RTE Admission: शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी आणखी एक संधी, 1 एप्रिलपर्यंत मुदतवाढ
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
RTE Admission: RTE कायद्यानुसार विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. या शाळांतील प्रवेशासाठी आता मुदतवाढ देण्यात आलीये.
मुंबई: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) वंचित आणि दुर्बल घटकातील 25 टक्के विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतात. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑनलाईन प्रक्रियेला 1 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे पालक आता 1 एप्रिलपर्यंत प्रवेश घेऊ शकतात.
काय आहे शिक्षण हक्क कायदा (RTE)?
शिक्षण हक्क कायद्यानुसार विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना इयत्ता पहिलीसाठी मोफत प्रवेश मिळतो.
प्रवेशासाठी मुदतवाढ का?
यंदा पहिल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश 18 ते 24 मार्च 2025 या कालावधीत पूर्ण करायचे होते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप प्रलंबित असल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही मुदत 1 एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
1,010 अर्ज अद्याप प्रलंबित
मुंबई विभागातील 327 शाळांमध्ये 1,260 पात्र अर्जदारांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 246 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर 4 अर्जदारांचे प्रवेश नाकारले गेले. मात्र, अद्याप 1,010 अर्ज प्रलंबित आहेत. शिक्षण विभागाने पात्र अर्जदारांना एसएमएसद्वारे सूचना पाठवल्या असून, पालकांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 26, 2025 12:26 PM IST