'1 कोटी दे'; मका विक्रीसाठी गेलेला शेतकरी झाला गायब; मुलाला आला फोन, अन्...छ. संभाजीनगर हादरलं
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
तुकाराम माधवराव गव्हाणे यांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकाराने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर : ‘तुझ्या वडिलांचे अपहरण झाले आहे, आम्ही सांगू तिथे 1 कोटी रुपये घेऊन ये…’ हा थरकाप उडवणारा फोन येताच एका शेतकऱ्याच्या मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील शेतकरी तुकाराम माधवराव गव्हाणे यांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकाराने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी (दि. 27) सायंकाळी तुकाराम गव्हाणे हे उंडणगाव येथे एका व्यापाऱ्याकडून मका विक्रीचे पैसे घेण्यासाठी गेले होते. काही रक्कम घेतल्यानंतर ते रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास दुचाकीने (एमएच 20 जीएफ 0443) बोदवड येथील घराकडे निघाले. मात्र उंडणगाव–बोदवड रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवून अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement
रात्री उशिरापर्यंत वडील घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, परिचितांकडे चौकशी करूनही कोणताही माग न लागल्याने अखेर अजिंठा पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, मध्यरात्री सुमारे बारा वाजता मुलाच्या मोबाईलवर एक कॉल आला. हा कॉल तुकाराम गव्हाणे यांच्या मोबाईलवरूनच करण्यात आला होता. कॉल करणाऱ्याने थेट अपहरणाची कबुली देत, 'आम्ही सांगू त्या ठिकाणी 1 कोटी रुपये घेऊन ये' अशी खंडणीची मागणी केली. या फोन कॉलने कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे अधिकारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी सक्रिय झाले आहे. अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली असून, तांत्रिक तपासाच्या माध्यमातून कॉलचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, रविवारी रात्री उशिरापर्यंत अपहृत शेतकरी किंवा संशयितांविषयी ठोस माहिती हाती आलेली नव्हती.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 10:17 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'1 कोटी दे'; मका विक्रीसाठी गेलेला शेतकरी झाला गायब; मुलाला आला फोन, अन्...छ. संभाजीनगर हादरलं










