पुन्हा तेच घडलं! मृत महिलेच्या गळ्यातील चोरलं मंगळसूत्र, नातेवाईक म्हणतात, "जिल्हा रुग्णालय आहे की..."
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
बीड जिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या सुमन शिंदे या महिलेच्या गळ्यातील...
बीड : जिल्हा रुग्णालयाचा अनागोंदी कारभार आता सर्व मर्यादा ओलांडत आहे. ज्या ठिकाणी रुग्णांना जीवनदान दिले जाते, त्याच ठिकाणी एका मृत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी सकाळी समोर आला आहे. कर्मचाऱ्यांनी 'आम्ही काय राखणदार आहोत का?' असे उलट उत्तर दिल्याने नातेवाईकांचा संताप अनावर झाला. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कर्मचाऱ्यांकडून उडावीउडवीची उत्तरं
सुमन जगन्नाथ घिगे (वय-62, रा. सोनगाव) यांना सोमवारी दुपारी छातीत कळ आल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे पती जगन्नाथ शिंदे होते. दुर्दैवाने, मंगळवारी पहाटे सुमन यांचा मृत्यू झाला. याच वेळी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आले.
advertisement
या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेबद्दल ड्युटीवरील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी आपली जबाबदारी झटकली. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी थेट जिल्हा शल्यचिकित्सकाकडे धाव घेतली. मात्र, त्यांनीही समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिली, ज्यामुळे नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले.
दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे सायंकाळी 6 वाजेपर्यंत मृतदेह रुग्णालयातच पडून होता. याच वेळी नातेवाईक गुन्हा दाखल करण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.
advertisement
पूर्वीही अशा घटना घडल्या आहेत
यापूर्वीही जिल्हा रुग्णालयात अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. प्रसूती झालेल्या मातेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यावेळी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते आणि बीड शहर पोलीस ठाण्यात त्याची नोंदही झाली होती. तसेच, मृतदेहांच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याच्या तक्रारीही यापूर्वी आल्या होत्या, पण त्यांचा तपास लागला नाही. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका होत आहे.
advertisement
हे ही वाचा : 'ही माझीच चूक आहे... आय ॲम सॉरी', म्हणत बड्या नेत्याच्या पुतण्याने घेतला गळफास; सुसाइड नोटमध्ये धक्कादायक खुलासा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 13, 2025 1:41 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पुन्हा तेच घडलं! मृत महिलेच्या गळ्यातील चोरलं मंगळसूत्र, नातेवाईक म्हणतात, "जिल्हा रुग्णालय आहे की..."