'बोला था खिलाफ में मत लड़, अब..'; भाजप उमेदवाराच्या घरावर जमावाचा जबर हल्ला, संभाजीनगरमध्ये खळबळ
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मनपा निवडणूक पराभूत झालेल्या एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराच्या घरावरती हल्ला केलेला आहे. पराभूत झाल्याच्या रागातून उमेदवाराने 10 ते 15 जणांच्या गटासह गांधीनगरात भाजपच्या उमेदवारासह त्यांचा प्रचार केलेल्या 3 ते 4 कुटुंबांच्या घरांवर दगडफेक केली.
छत्रपती संभाजीनगर : सात ते आठ वर्षानंतर राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुका झाल्या. 15 जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या मतदान झाले आणि 16 जानेवारीला याचा निकाल जाहीर झाला. यामध्ये काहींना यश आले तर काहींना अपयश आले. पण मनपा निवडणूक पराभूत झालेल्या एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराच्या घरावरती हल्ला केलेला आहे. पराभूत झाल्याच्या रागातून उमेदवाराने 10 ते 15 जणांच्या गटासह गांधीनगरात भाजपच्या उमेदवारासह त्यांचा प्रचार केलेल्या 3 ते 4 कुटुंबांच्या घरांवर दगडफेक केली. वाहनांची तोडफोड करत जिवे मारण्याची धमकी दिली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या राड्यामुळे शनिवारी पण तणाव कायम होता.
याप्रकरणी मिल्लू चावरिया, दिनेश चावरिया ऊर्फ कांटो, संदीप कागडा, अक्षय चावरिया, रोहित हिवराळे, साहिल चावरिया, अमित लव्हेरा, प्रेम नितनवरे, निखिल चावरियासह बीडच्या राहुल नामक तरुणावर क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तक्रारदार विकी चावरिया (36, रा. गांधीनगर) हे मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास बंटी चावरिया यांच्यासह चर्चा करत होते. अचानक गोंधळ घालत जमाव त्यांच्या घराकडे आला. जमावाने त्यांच्यासह अन्य दोन-तीन घरांवर दगडफेक केली. विकी यांना उद्देशून 'बोला था खिलाफ में इलेक्शन मत लढ, अब तुम दोनों का जीने नहीं देंगे, जान से मार देंगे' अशी धमकी दिली.
advertisement
काय आहे वादाची पार्श्वभूमी
हल्ला झालेले बंटी चावरिया हे प्रभाग 15 (अ) मधून भाजपचे उमेदवार होते. तेथून सचिन खैरे विजयी झाले, तर बंटी चावरिया, सुमित जमधडे (एमआयएम), मिलाप चावरिया (शिंदेसेना), विजेता चावरिया (रा.अ.प.) व दीक्षा भावसार (व्हीएमआरजे आघाडी) हे उमेदवार होते. यात मिलाप चावरिया यांनी बंटी चावरिया यांना पराभवासाठी जबाबदार धरत हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शनिवारीदेखील गांधीनगरमध्ये दंगा काबू पथकाचा बंदोबस्त कायम होता.
advertisement
शस्त्रधारी जमावाने विकी यांच्यासह त्यांच्या शेजारील कुटुंबांच्या घरांवरही दगडफेक केली. 4 ते 5 वाहनांसह खिडक्या, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. घटनेची माहिती कळताच क्रांतीचौक पोलिसांसह दंगा काबू पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आरोपींचा शोध सुरू झाला. विकी यांच्या तक्रारीवरून 14 जणांवर गुन्हा दाखल केला.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 9:57 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'बोला था खिलाफ में मत लड़, अब..'; भाजप उमेदवाराच्या घरावर जमावाचा जबर हल्ला, संभाजीनगरमध्ये खळबळ






