लव्ह अफेअर अन् रोमँटीक गाणं, भाजप नेत्यानं पत्नीसह 3 मुलांना गोळ्या का घातल्या? धक्कादायक कारण समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भाजपच्या एका नेत्याने शनिवारी दुपारी आपल्याच कुटुंबीयांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी भाजप नेत्याने आपल्या पत्नीसह तीन मुलांवर अंदाधुंद गोळीबार केला.
भाजपच्या एका नेत्याने शनिवारी दुपारी आपल्याच कुटुंबीयांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी भाजप नेत्याने आपल्या पत्नीसह तीन मुलांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास आरोपीने आपल्या परवानाधारक बंदुकीतून हा गोळीबार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने स्वत: पोलीस ठाण्यात फोन करून गोळीबार केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
योगेश रोहिला असं अटक केलेल्या हल्लेखोर भाजप नेत्याचं नाव आहे. तो भाजप युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. शनिवारी दुपारी त्याने आपल्या कुटुंबावर बेछूट गोळीबार केला. ज्यात ११ वर्षीय मुलगी श्रद्धा, मुलगा शिवांश (४) आणि देवांश (६) अशा तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर ३१ वर्षीय पत्नी नेहा गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील सांगठेगा गावात घडली.
advertisement
गोळीबाराचं नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश आणि पत्नी नेहा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. पत्नी नेहाचं बाहेर कुठल्यातरी तरुणासोबत अफेअर सुरू असल्याचा संशय योगेशला होता. या कारणातून अनेकदा दोघांमध्ये वाद झाला होता. अनैतिक संबंधाच्या कारणातून योगेशनं अनेकदा आपल्या पत्नीला मारहाण देखील केली होती. या वादामुळे योगेश गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात देखील होता.
advertisement
दरम्यान, घटनेच्या दिवशी पत्नी नेहा एक रोमँटीक गाणं गुणगुणत होती. हे गाणं आरोपी योगेशच्या कानावर पडलं. यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. तू कुणासाठी हे गाणं गुणगुणतेय, असा जाब योगेशने पत्नीला विचारला. वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात योगेशनं आपल्या परवानाधारक बंदूकीतून पत्नीवर गोळीबार केला. पत्नीनंतर मुलांचं काय होणार? या चिंतेतून त्याने आपल्या तिन्ही मुलांवर देखील गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच शेजारील लोक योगेशच्या घरी आले, त्यावेळी पत्नीसह योगेशची तिन्ही मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
advertisement
शेजाऱ्यांनी तातडीनो चौघांनाही रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशिर झाला होता. रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी मुलगी आणि एका मुलाला मृत घोषित केलं. यानंतर काही मिनिटांत दुसऱ्या मुलांनं देखील अखेरचा श्वास घेतला. पत्नी नेहा मात्र या हल्ल्यातून थोडक्यात बचावली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
Location :
Saharanpur,Uttar Pradesh
First Published :
March 23, 2025 1:14 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
लव्ह अफेअर अन् रोमँटीक गाणं, भाजप नेत्यानं पत्नीसह 3 मुलांना गोळ्या का घातल्या? धक्कादायक कारण समोर