'पप्पा, मला चॉकलेट द्याना', चिमुरडीच्या मागणीने बाप संतापला, थेट गळा आवळून केला खून, मन हेलावणारी घटना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Latur: लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे एका व्यक्तीने आपल्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे.
शशिकांत पाटील, प्रतिनिधी लातूर : लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. केवळ चॉकलेट मागितल्याच्या कारणातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. मुलीनं चॉकलेट मागितलं म्हणून संतापलेल्या बापाने थेट तिचा जीवच घेतला आहे. हत्येचं हे प्रकरण उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
आरुषी बालाजी राठोड असं हत्या झालेल्या चार वर्षीय मुलीचं नाव आहे. तर बालाजी बाबू राठोड असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बालाजी याला दारुचं व्यसन आहे. तो अनेकदा दारु पिऊन पत्नी वर्षाला त्रास द्यायचा, मारहाण करायचा. आरोपीच्या त्रासाला कंटाळून तीन महिन्यांपूर्वी पत्नी आपल्या दोन्ही मुलांसह माहेरी गेली होती. पण ९ जून रोजी आरोपी आपल्या सासुरवाडीला गेला. त्याने जबरदस्ती करत आरुषीला आपल्या घरी घेऊन आला.
advertisement
राहत्या घरात साडीने आवळला गळा
तेव्हा पासून आरुषी आपल्या वडिलांसोबत राहत होती. दरम्यानच्या काळात नातेवाईकांनी अनेकदा बालाजीला समजावून सांगितलं. मुलीला तिच्या आईकडे नेऊन सोडण्याची विनंती केली. पण त्याने कुणाचंच ऐकलं नाही. दरम्यान, रविवारी दुपारी चिमुकल्या आरुषीने आपल्या वडिलांकडे चॉकलेटसाठी पैसे मागितले. या रागातून बालाजीने राहत्या घरात साडीने आरुषीचा गळा आवळला आणि तिचा जीव घेतला.
advertisement
आरोपी बापाला अटक
हत्येची ही घटना घडल्यानंतर रविवारी दुपारी अडीच वाजता सासू मंगलबाई बाबू राठोड यांनी वर्षाच्या काकांच्या मोबाईलवर फोन करून आरुषीच्या हत्येची माहिती दिली. चिमुकल्या मुलीचा बापाने जीव घेतल्याचं समजताच वर्षा यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने उदगीर येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली. मुलीला मृत पाहून त्यांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी मयत मुलीची आई वर्षा राठोड यांच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिसांनी आरोपी बालाजी राठोड याला अटक केली आहे. पती बालाजी राठोड याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पत्नी वर्षा राठोड यांनी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
June 30, 2025 7:11 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'पप्पा, मला चॉकलेट द्याना', चिमुरडीच्या मागणीने बाप संतापला, थेट गळा आवळून केला खून, मन हेलावणारी घटना