Sangli News: रेठरेधरणात श्रेयवादातून राडा; उपसरपंचाच्या घरात घुसून आई आणि पत्नीला बेदम मारहाण!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
वाळवा तालुक्यातील रेठरेधरण येथे वाकुर्डे योजनेच्या श्रेयवादातून राजकीय वाद विकोपाला गेला आहे. गुरुवारी सकाळी उपसरपंच मदन पाटील यांच्या घरात घुसून 13 संशयितांनी त्यांची...
इस्लामपूर (सांगली) : वाकुर्डे योजनेच्या श्रेयवादाचा वाद इतका विकोपाला गेला की, थेट उपसरपंचाच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार रेठरेधरण (ता. वाळवा) येथे घडला आहे. गुरुवारी सकाळी घडलेल्या या घटनेत उपसरपंच मदन पाटील यांच्या पत्नी कोमल मदन पाटील (वय-43) आणि आई सावित्री शिवाजी पाटील (वय-75) या जखमी झाल्या आहेत. जखमी कोमल पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घरात घुसून साहित्याची तोडफोड, गाड्यांचे नुकसान
संशयितांनी केवळ मारहाण केली नाही, तर घरात घुसून साहित्याची मोडतोड केली आणि घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांचेही नुकसान केले. या प्रकरणी विकास विलास पाटील, सुहास गुणवंत पाटील, तानाजी मारुती पाटील, बाजीराव मारुती पाटील, विनायक बाजीराव पाटील, सर्जेराव वसंत पाटील, सचिन शिवाजी पाटील, शंभू विकास पाटील, सुयोग अशोक पाटील, पिल्या लोहार, सुयोग मोहिते, दादा पवार, स्वप्निल सूर्यवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
वादाची ठिणगी आणि त्यानंतरचा हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकुर्डे योजनेचे पाणी गावामध्ये आणण्याच्या श्रेयवादावरून रेठरेधरण ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वाद सुरू होता. गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उपसरपंच मदन पाटील यांचा मुलगा ओंकार शेतातून परत येत असताना, बसस्थानकासमोर त्याला विकास पाटील भेटला. "काय बघतोस माझ्याकडे, तुला लय मस्ती आली आहे," असे म्हणून विकासने ओंकारला डिवचले आणि निघून गेला.
advertisement
याचा जाब विचारण्यासाठी मदन पाटील आणि त्यांचा मुलगा ओंकार हे विकास पाटीलच्या घरी गेले. त्यावेळी त्या दोघांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर, सकाळी 9.30 च्या सुमारास कोमल आणि सावित्री पाटील या दोघी घरात असताना, संशयित विकास, सुहास, तानाजी, बाजीराव, विनायक, सर्जेराव, सचिन आणि इतर काही जण हातात काठ्या, लोखंडी गज आणि दगड घेऊन थेट उपसरपंच मदन पाटील यांच्या घरात घुसले.
advertisement
त्यांनी कोमल पाटील यांना दगड मारला आणि सावित्री पाटील यांना ढकलून दिले. "तुझा नवरा आणि मुलगा कुठे आहेत? त्यांना कुठे लपवले आहेस? त्यांचा आज शेवटच करतो," असे म्हणत संशयितांनी घरात मदन आणि ओंकारचा शोध घेतला. या दरम्यान, त्यांनी घरातील सर्व साहित्य विस्कटून टाकले आणि दुकानाजवळ लावलेल्या दुचाकींवर दगड व काठ्या मारून त्यांचेही मोठे नुकसान केले. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
हे ही वाचा : Weather Alert: विजा कडाडणार, कोल्हापूर ते पुणे पुन्हा धो धो पाऊस, 2 ऑगस्टचा हवामान अंदाज
हे ही वाचा : इस्लामपुरात थरकाप! भरदुपारी सराईत गुंडाचा धारदार शस्त्रांनी खून; देत होता खुन्नस, म्हणून केला खेळ खल्लास!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 02, 2025 9:35 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Sangli News: रेठरेधरणात श्रेयवादातून राडा; उपसरपंचाच्या घरात घुसून आई आणि पत्नीला बेदम मारहाण!