इन्स्टावर ओळख अन् लग्नाचा हट्ट, वर्ध्यात नर्सवर कटरने वार, हल्ल्याचं कारण समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात भर रस्त्यावर एका तरुणाने एका नर्सवर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपीनं धारदार कटरने नर्सच्या हातावर अनेक ठिकाणी वार केले.
नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा: वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात भर रस्त्यावर एका तरुणाने एका नर्सवर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपीनं धारदार कटरने नर्सच्या हातावर अनेक ठिकाणी वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. या हल्ल्यानंतर तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला आणि थेट पोलीस ठाण्यात सरेंडर केलं. या घटनेने वर्धा शहरात खळबळ उडालीय. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
पीडित नर्स आणि हल्लेखोर तरुण हे एकमेकांच्या ओळखीचे असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांची काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. याच ओळखीतून तरुणाने नर्सवर एकतर्फी प्रेम करायला सुरुवात केली होती. त्याने तरुणीकडे लग्नाची मागणी घातली. पण तिने लग्नास नकार दिला. तरीही आरोपी तरुणीशी लग्न करण्यासाठी हट्टाला पेटला. याच कारणातून त्याने सोमवारी नर्सवर कटरने वार केले. वर्ध्याच्या मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ नर्सवर हा प्राणघातक हल्ला झाला.
advertisement
तरुणाने नर्सच्या हातावर कटरने घाव करत गंभीर जखमी केले. हा हल्ला झाल्यानंतर तरुणीने रक्तबंबाळ अवस्थेत बाजुलाच असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात धाव घेतली. पक्षाच्या कार्यालयात आश्रय घेतल्याने ती थोडक्यात बचावली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. हल्ला केल्यानंतर तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला, पण जमाव पाठीमागे लागल्याने त्याने रस्त्यावरच असलेल्या रामनगर पोलीस ठाण्यात प्रवेश करत शरणागती पत्करली.
advertisement
जमावाचा पाठलाग सुरू असताना आरोपी रामनगर पोलीस ठाण्यात शरण गेल्यामुळे तो बचावला. ही घटना वर्धा शहराच्या मध्य भागात असलेल्या रस्त्यावर घडली आहे. 24 वर्षांची ही तरुणी नर्स म्हणून एका खाजगी रुग्णालयात काम करत होती. रुग्णालयाजवळ असलेल्या रस्त्यावर तिला तरुण भेटला.
तरुणीसोबत बोलत असताना अचानक काही वेळानंतर सौरभ रवींद्र क्षीरसागर या 29 वर्षीय तरुणाने त्याच्या हातातले कटर बाहेर काढले आणि तरुणीवर सपासप वार करत तिला गंभीर जखमी केलं. तरुणीवर हल्ला केल्यानंतर सौरभने तिथून पळ काढला. यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी त्याचा पाठलाग केल्यामुळे तो रामनगर पोलीस ठाण्यात बचावासाठी गेला आणि शरणागती पत्करली. सौरभ रवींद्र क्षीरसागर हा तरुण भुगावचा राहणारा आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
July 01, 2025 12:45 PM IST