SBI ला गंडवलं! खोटं सोनं तारण ठेवून 7 लाखांचं घेतलं कर्ज, 10 वर्षांनी कळली फसवणूक; सराफांनी केली होती मदत!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सांगली जिल्ह्यातील पलूस येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेत बनावट सोने तारण ठेवून तब्बल ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
पलूस (सांगली) : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेत बनावट सोने तारण ठेवून तब्बल 7 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज काढून बँकेची फसवणूक केल्याचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
या प्रकरणी गोरख मच्छिंद्र पाखरे (वय-40, रा. पलूस) यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजेंद्र विठ्ठलराव यादव (रा. रामपूर, ता. कडेगाव), राजेंद्रकुमार संतराव शिंदे आणि सुधाकर शिवाजी सूर्यवंशी (दोघे रा. पलूस) या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कसा घडला हा फसवणुकीचा प्रकार?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मे 2015 ते 16 मे 2025 या दहा वर्षांच्या कालावधीत राजेंद्र यादव यांनी एसबीआयच्या पलूस शाखेतून सोने तारण कर्ज घेतले होते. कर्ज प्रक्रियेदरम्यान, तारण ठेवण्यात आलेले सोने खरे आहे की नाही, याची खातरजमा राजेंद्रकुमार शिंदे आणि सुधाकर सूर्यवंशी या स्थानिक सराफांनी केली होती. या सराफांनी संबंधित सोने खरे असल्याचे बँकेला भासवून चुकीची माहिती दिली. त्यांच्या या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून बँकेने अंदाजे 204.13 ग्रॅम सोने तारण म्हणून स्वीकारले आणि त्यावर 7 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले.
advertisement
बनावट सोने उघडकीस, बँकेची फसवणूक
मात्र, काही दिवसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना या सोन्याबाबत संशय आला. त्यांनी तातडीने सोन्याची कसून तपासणी केली. या तपासणीअंती संबंधित सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणामुळे बँकेची मोठी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, प्राथमिक तपासानुसार संबंधित व्यक्तींनी संगनमत करून बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या गंभीर प्रकारानंतर पलूस पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. फसवणुकीचा हा प्रकार आर्थिक गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर मानला जात असून, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही कसून तपास सुरू आहे.
advertisement
हे ही वाचा : इस्लामपुरात थरकाप! भरदुपारी सराईत गुंडाचा धारदार शस्त्रांनी खून; देत होता खुन्नस, म्हणून केला खेळ खल्लास!
हे ही वाचा : Sangli News: रेठरेधरणात श्रेयवादातून राडा; उपसरपंचाच्या घरात घुसून आई आणि पत्नीला बेदम मारहाण!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 02, 2025 12:03 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
SBI ला गंडवलं! खोटं सोनं तारण ठेवून 7 लाखांचं घेतलं कर्ज, 10 वर्षांनी कळली फसवणूक; सराफांनी केली होती मदत!