'हे नाटक तुमच्या मेंदूत...', 'देवबाभळी'नंतर परेश रावल यांना आणखी एका मराठी नाटकाची भुरळ! कौतुक करताना भावुक, VIDEO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
अनेकदा हिंदी कलाकार मराठी नाटकांच्या ताकदीबद्दल बोलताना दिसतात, पण जेव्हा अभिनय क्षेत्रातील दिग्गज परेश रावल एखाद्या नाटकाचं जाहीर कौतुक करतात, तेव्हा त्या कलाकृतीचं वजन काही वेगळंच असतं.
मुंबई : मराठी रंगभूमीचा दबदबा आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून, तो थेट बॉलिवूडच्या 'ए-लिस्टर्स'पर्यंत पोहोचला आहे. अनेकदा हिंदी कलाकार मराठी नाटकांच्या ताकदीबद्दल बोलताना दिसतात, पण जेव्हा अभिनय क्षेत्रातील दिग्गज परेश रावल एखाद्या नाटकाचं जाहीर कौतुक करतात, तेव्हा त्या कलाकृतीचं वजन काही वेगळंच असतं. सध्या मराठी रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाने केवळ प्रेक्षकांनाच नाही, तर परेश रावल आणि विद्या बालन सारख्या अष्टपैलू कलाकारांनाही थिएटरपर्यंत खेचून आणलं आहे.
नाटक पाहून भारावले परेश रावल
नुकतंच परेश रावल यांनी हे नाटक पाहिलं आणि ते इतके भारावून गेले की त्यांनी आपला अनुभव एका व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला. अभिनेत्री अमृता सुभाषने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो सध्या व्हायरल होत आहे.
परेश रावल म्हणतात, "‘असेन मी नसेन मी’ पाहून मी खरंच निशब्द झालो. हे केवळ नाटक नाही, तर म्हातारपणातील नात्यांचा आणि संघर्षाचा एक आरसा आहे. जेव्हा घरातील एखादी व्यक्ती आजारी पडते, तेव्हा केवळ तीच नाही तर अख्खं कुटुंब कसं होरपळून निघतं, हे यात इतक्या प्रभावीपणे मांडलंय की डोळ्यांत पाणी येतं. नाटक संपल्यावर पडदा पडतो, पण खरी अस्वस्थता तिथून सुरू होते. हे नाटक तुमच्या मेंदूत आणि मनात घर करून राहतं."
advertisement
advertisement
विद्या बालनचीही स्पेशल हजेरी
केवळ परेश रावलच नाही, तर अभिनयाची खाण असलेली अभिनेत्री विद्या बालनसुद्धा आपल्या आई आणि बहिणीसोबत हे नाटक पाहण्यासाठी पोहोचली होती. मराठी नाटकांची संहिता आणि त्यातील कलाकारांचा अभिनय हा नेहमीच बॉलिवूडला भुरळ घालत आला आहे, याची प्रचिती या निमित्ताने पुन्हा एकदा आली.
पुरस्कारांचा पाऊस आणि तगडी स्टारकास्ट
advertisement
‘असेन मी नसेन मी’ हे नाटक केवळ कौतुकापुरतं मर्यादित नाही, तर या नाटकाने यशाचे अनेक टप्पे गाठले आहेत. अमृता सुभाष, नीना कुळकर्णी आणि शुभांगी गोखले या तीन दिग्गज अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने या नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या नाटकाला आतापर्यंत चक्क २४ पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यात महाराष्ट्र शासनाचे ८, नाट्य परिषदेचे ४ आणि दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांसह झी, माझा व मटा अशा विविध नामांकित पुरस्कारांचा समावेश आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 4:17 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'हे नाटक तुमच्या मेंदूत...', 'देवबाभळी'नंतर परेश रावल यांना आणखी एका मराठी नाटकाची भुरळ! कौतुक करताना भावुक, VIDEO









