'ते काम मात्र अपुरेच राहिले', धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना हेमा मालिनींचा कंठ दाटून आला; स्टेजवरच फुटला अश्रूंचा बांध, VIDEO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dharmendra Tribute: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी हेमा मालिनी, ईशा देओल, आहाना देओल यांनी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात खास सभेचे आयोजन केले होते.
मुंबई: बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर आज दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी त्यांच्या मुली ईशा देओल आणि आहाना देओल यांच्यासह आयोजित केली होती. या सभेला त्यांचे कुटुंब, चित्रपटसृष्टीतील सहकर्मी आणि अनेक राजकीय मान्यवरांनी हजेरी लावली.
धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना हेमा मालिनींना कंठ दाटून आला
यावेळी व्यासपीठावर आलेल्या हेमा मालिनी अत्यंत भावूक झाल्या होत्या. आपल्या शब्दांना अश्रूंचा बांध फुटू नये म्हणून त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. "आजच्या या प्रार्थना सभेत मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत असताना खूपच भावूक झाली आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
advertisement
"माझ्या आयुष्यात असा क्षण येईल, जेव्हा मला धर्मजींसाठी श्रद्धांजली सभा आयोजित करावी लागेल, याची मी कल्पनाही केली नव्हती. संपूर्ण जग आज त्यांच्या जाण्याने दु:खी आहे, पण माझ्यासाठी हा एक न भरून येणारा धक्का आहे. एक अशी साथ तुटली आहे, जी काळाच्या कसोटीवर खरी उतरली होती," असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले.
advertisement
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या साधेपणाला आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देत सांगितले, "धर्मजींनी कधीही स्वतःला इतरांपेक्षा वेगळे मानले नाही. ते आयुष्यभर डाऊन टू अर्थ राहिले. श्रीमंत असो वा गरीब, ओळखीचा असो वा अनोळखी ते प्रत्येकाशी प्रेम, आदर आणि सन्मानाने बोलायचे. ते असे महान व्यक्तिमत्त्व होते."
advertisement
त्यांनी आपल्या आणि धर्मेंद्र यांच्यातील व्यावसायिक संबंधांचीही आठवण करून दिली. त्या म्हणाल्या "माझा त्यांच्यासोबत ५७ वर्षांचा सहवास आहे. मी इंडस्ट्रीत आले तेव्हा मला त्यांच्यासोबत सर्वाधिक काम करण्याची संधी मिळाली. आम्ही जवळपास ४५ चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी २५ चित्रपट सुपरहिट झाले. पडद्यावरची आमची जोडी लोकांना खूप आवडली आणि प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले."
advertisement
advertisement
धर्मेंद्र यांचा 'तो' छंद अपूर्णच राहिला
धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीबद्दल बोलताना हेमा मालिनींनी सांगितले की, "त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. पण त्यांना कॉमेडी भूमिका करायला सर्वाधिक आवडायच्या. कॅमेऱ्यासमोर ते अधिक उत्साही असायचे."
त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात समोर आलेल्या एका खास छंदाबद्दलही हेमा मालिनींनी सांगितले. त्या म्हणाल्या, "वेळेनुसार, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक छुपा पैलू आमच्या समोर आला. ते कविता लिहू लागले होते. त्यांच्याकडे एक विशेष कला होती की कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे कविता तयार असायची. मी त्यांना नेहमी सांगायची की, त्यांनी या कवितांचे पुस्तक लिहावे. त्यांचे चाहते ते नक्कीच पसंत करतील. यासाठी ते खूप गंभीर होते आणि सर्व योजना आखत होते. पण... ते काम मात्र अपुरे राहिले," असे म्हणताना हेमा मालिनींना कंठ दाटून आला होता.
advertisement
दरम्यान, हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली ईशा आणि आहाना यांनी आयोजित केलेल्या या प्रार्थनासभेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, खासदार अनुराग ठाकूर यांसारख्या अनेक राजकीय दिग्गजांनी उपस्थित राहून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2025 9:05 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'ते काम मात्र अपुरेच राहिले', धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना हेमा मालिनींचा कंठ दाटून आला; स्टेजवरच फुटला अश्रूंचा बांध, VIDEO










