'हे' दोन सिनेमे नाकारणं माझी मोठी चूक, शत्रुघ्न सिन्हांना होतो आजही पश्चात्ताप
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
बिग बी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा ‘शोले’ हा चित्रपट हिंदी सिनेमाच्या इतिहासातला एक ‘कल्ट क्लासिक’ म्हणून ओळखला जातो. शोलेची कथा, त्यातली प्रत्येक व्यक्तीरेखा, संवाद आजही प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवतात.
मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा ‘शोले’ हा चित्रपट हिंदी सिनेमाच्या इतिहासातला एक ‘कल्ट क्लासिक’ म्हणून ओळखला जातो. शोलेची कथा, त्यातली प्रत्येक व्यक्तीरेखा, संवाद आजही प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवतात. शोले बघताना वाटतं यातले ‘जय-वीरु’ अमिताभ आणि धर्मेंद्र यांच्याशिवाय कुणी साकारूच शकलं नसतं. पण खरं तर शोलेचे दिग्दर्शक रमेश सिप्पींना शत्रुघ्न सिन्हा यांना घेऊन शोले करायचा होता हे खूप कमी लोकांना माहिती आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी अलीकडेच या बाबत खुलासा केला आहे. सिन्हा यांनी सांगितलं की, रमेश सिप्पी यांनी ‘शोले’ साठी सिन्हांची खूप वाट बघितली पण व्यस्त वेळापत्रकामुळे ते ‘शोले’ साठी वेळ काढू शकले नाहीत. अमिताभ बच्चन यांचा ‘दीवार’ आणि मनोज कुमार यांचा ‘शोर’ हे सिनेमे चालून आले, मात्र मी ते नाकारले, आज मला याचा खूप पश्चात्ताप होतो.
advertisement
‘आज तक’ ला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं, ‘मला शोलेमधील अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखेसाठी रमेश सिप्पी यांनी विचारलं होतं. सिप्पी यांनी त्यांच्या पुस्तकातही हे लिहिलं आहे. मी तारखांची जुळवाजुळव करण्याचा खूप प्रयत्न केला; पण त्यावेळी मी कितीतरी सिनेमे करत होतो. त्यामुळे मी खरंच खूप बिझी होतो. सिप्पींनाही मी किती दिवस वेळ काढायला हवा याचा नेमका अंदाज नव्हता. मी सगळ्या तारखा शोलेसाठी राखून ठेवाव्या असं त्यांचं म्हणणं होतं. ते मला शक्य झालं नाही. त्यामुळे शोले मी करु शकलो नाही. आता मला या गोष्टीचं वाईट वाटतं. पण अमिताभ बच्चनचं कौतुकही वाटतं. ‘शोले’ मुळे तो नॅशनल आयकॅान ठरला, असंही सिन्हा यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.
advertisement
सिन्हांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत कित्येक सिनेमे नाकारले. ते म्हणाले, ‘दीवारमधील प्रमुख भूमिकेसाठी मला विचारण्यात आलं होतं. मी करु शकलो नाही. तुम्ही याला चूक म्हणू शकता; पण दीवारबद्दलसुद्धा मला अमिताभचं कौतुकच करायला हवं. त्याने दीवारमध्ये जबरदस्त काम केलं. मी हे सिनेमे करायला हवे होते; पण मी केले नाहीत. मला अजूनही माझ्या निर्णयांचा पश्चात्ताप होतो, त्यामुळे मी हे दोन्ही सिनेमे अजूनही पाहिलेले नाहीत,’ अशा शब्दांत सिन्हा आपली हळहळ व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, ‘ ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार मला त्यांच्या ‘शोर’ चित्रपटात भूमिका देत होते. त्यासाठी ते कितीतरी वेळा माझ्या घरी आले. त्यांना चार महिन्यांत सिनेमा करायचा होता. मी त्यांना आठ महिन्यांचा वेळ देत होतो. प्रत्यक्षात ‘शोर’ पूर्ण व्हायला 16 महिने लागले. म्हणजे मी काम करू शकलो असतो, पण मी नाही म्हणून बसलो होतो. मला ‘शोर’ नाकारणंही जिव्हारी लागलं. मी आजपर्यंत ‘शोर’ही पाहिलेला नाही.’
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 23, 2024 11:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'हे' दोन सिनेमे नाकारणं माझी मोठी चूक, शत्रुघ्न सिन्हांना होतो आजही पश्चात्ताप