"2-3 कानाखाली मारून..." मराठी-हिंदी वादात रेणुका शहाणेंची उडी! मारहाण करणाऱ्यांचे पिळले कान
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Renuka Shahane on Maharashtra Language Controversy : महाराष्ट्रातील भाषिक वाद इतका वाढलाय की, आता राजकीय वातावरण तापण्यासोबतच, सिनेसृष्टीतील कलाकारही यावर आपलं मत मांडू लागले आहेत.
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र आणि हिंदी-मराठी भाषेचा वाद चांगलाच पेटला आहे. महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत कोणती भाषा बोलली जावी याबाबत प्रत्येकजण काही ना काही मत मांडतंय. अनेक अमराठी कलाकार-नेत्यांनी मराठीत बोलणार नाही, असं ठणकावलं, तर मराठी भाषिकांनी अशी उद्धट प्रतिक्रिया देणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. हा भाषिक वाद इतका वाढलाय की, आता राजकीय वातावरण तापण्यासोबतच, सिनेसृष्टीतील कलाकारही यावर आपलं मत मांडू लागले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत, आणि आता यात भर पडली आहे अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्या नावाची! त्यांनीही या वादावर आपलं रोखठोक मत मांडलंय.
रेणुका शहाणे यांनी भाषेच्या वादावर बोलताना, आपण जिथे राहतो तिथल्या स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा आदर करायलाच हवा, असं स्पष्ट केलं. एवढंच नाही, तर हिंसा करण्याऐवजी सामंजस्य असणं जास्त महत्त्वाचं आहे, असंही त्या म्हणाल्या. त्यांनी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये मराठी-हिंदी भाषेच्या वादावर आपलं मत व्यक्त केलं.
भाषावादावर काय म्हणाल्या रेणूका शहाणे?
रेणुका शहाणे म्हणाल्या, "जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बऱ्याच काळापासून राहत असाल, तर तिथली स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृती समजून घेणं आणि इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त तिचा आदर करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त बोलण्याचीच नाही, तर तिचा आदर करण्याची इच्छा असणं महत्त्वाचं आहे. मला असे लोक अजिबात आवडत नाहीत, ज्यांच्या मनात स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृतीबद्दल सहानुभूती आणि आदर नसतो."
advertisement
त्या पुढे म्हणाल्या, "मला हिंसा अजिबात आवडत नाही. भाषेवरून असभ्य वागणं हे मला मुळीच पटत नाही. जिथे मराठी बोलली जात नाही, अशा ठिकाणी जाऊन दोन-तीन कानाखाली मारून काहीच साध्य होणार नाही, अशी मारहाण करण्याला काहीच अर्थ नाहीये. त्याने भाषेला कोणताही फायदा होणार नाही." रेणुका शहाणे यांची ही प्रतिक्रिया सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
advertisement
मातृभाषेच्या सन्मानावर आशुतोष राणा यांचंही रोखठोक मत!
दरम्यान, रेणुका यांचे पती आशुतोष राणा यांनी देखील यापूर्वी मातृभाषेचा आदर झालाच पाहिजे, असं म्हटलं होतं. "माझ्या मते भाषा हा संवादाचा विषय आहे. भाषा कधीही वादाचा विषय असू शकत नाही. भारत कधीही वादावर विश्वास ठेवत नाही," असंही ते म्हणाले होते. तसंच, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि इथे प्रत्येक भाषा आणि संस्कृतीला स्वीकारलं जातं, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा या दोघांनीही मांडलेलं हे मत सध्याच्या परिस्थितीत खूप महत्त्वाचं ठरतंय. भाषेच्या नावावर होणारी ही धुसफूस थांबवून, एकमेकांचा आदर करणं किती गरजेचं आहे, हेच त्यांच्या बोलण्यातून समोर येतंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 17, 2025 6:21 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
"2-3 कानाखाली मारून..." मराठी-हिंदी वादात रेणुका शहाणेंची उडी! मारहाण करणाऱ्यांचे पिळले कान








