'लाज वाटते, वर्दी घातलीय ना तू' पोलीस अधिकाऱ्याकडून आरोपी महिलेकडे शरीर सुखाची मागणी, अकोल्यात खळबळ
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अकोला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ८० लाख फसवणुकीत अटक महिलेनं ASI राजेश जाधव यांच्यावर कोठडीत लैंगिक शोषणाची मागणी केल्याचा आरोप, वरिष्ठांनी एएसआयला झापलं, तपास सुरू
प्रतिनिधी कुंदन जाधव: रक्षणकर्तेच भक्षक बनले की काय? असा प्रश्न निर्माण करणारी एक संतापजनक घटना अकोल्यात घडली आहे. एका फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या महिला आरोपीने कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप केला. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आला. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
संबंधित महिलेला सायबर पोलिसांनी एका ८० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटक केली होती. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीत असताना तिथे कार्यरत असलेले ASI राजेश जाधव यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा दावा या महिलेने केला. ही बाब महिलेने तिथे असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या कानावर घातली आणि एकच खळबळ उडाली.
advertisement
वरिष्ठांचा चढला पारा; ठाण्यातच झापलं!
आपल्याच विभागातील एका जबाबदार अधिकाऱ्याने इतकं नीच कृत्य केल्याचं समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठांनी संबंधित एएसआयची सर्वांसमोर चांगलीच कानउघडणी केली आणि त्यांना कडक शब्दांत झापले. लाज वाटते, तू वर्दी चढवली आहेस असं म्हणते वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या पोलिसाची खरडपट्टी काढली. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झालं होते.
advertisement
तपासाचे मोठे आव्हान
महिलेने केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. मात्र, हे आरोप केवळ सुडबुद्धीने केले आहेत की यात खरंच तथ्य आहे, याचा शोध घेणं आता पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे. पोलीस कोठडीतच जर महिला सुरक्षित नसतील, तर जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे अकोल्यातील पोलीस वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले असून, दोषीवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Akola,Akola,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 12:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'लाज वाटते, वर्दी घातलीय ना तू' पोलीस अधिकाऱ्याकडून आरोपी महिलेकडे शरीर सुखाची मागणी, अकोल्यात खळबळ









